मुंबई : तेलंगणाचे (Telangana) नवे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ए रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी लोकसभा (Lok Sabha) खासदारकीचा राजीनामा दिला. मी खासदारपद सोडले आहे, पण जनतेशी माझे नाते कायम राहील, अशी प्रतिक्रिया रेवंत रेड्डी यांनी यावेळी दिली. रेवंत रेड्डी यांनी आपला राजीनामा सोशल मीडियावर शेअर केला आहे.   मलकाजगिरीच्या लोकांचे माझ्या हृदयात स्थान आहे आणि राहील, असं देखील ते म्हणाले. 






रेवंत रेड्डी यांनी त्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्त केला. दरम्यान या राजीनाम्याची आजपासून अंमलबजावणी करुन तो स्विकारण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. संसदेत ते ज्या ठिकाणी बसायचे त्या जागेचा फोटो देखील रेवंत रेड्डी यांनी शेअर केलाय. काँग्रेसने तेलंगणात विजयाचा झेंडा फडकवल्यानंतर काँग्रेसचे नेते रेंवतं रेड्डी यांनी गुरुवार 7 डिसेंबर रोजी मु्ख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 


रेवंत रेड्डींचा विजय 


रेवंत रेड्डी यांनी तेलंगणातील दोन जागांवरून विधानसभा निवडणूक लढवली होती. येथील कोडंगल मतदारसंघातून रेवंत रेड्डी विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर असलेले भारत राष्ट्र समिती (BRS) उमेदवार पी नरेंद्र रेड्डी यांना 74 हजार 897 मतं मिळाली तर रेवंत रेड्डी यांनी 1 लाख 74 हजार 429 मतं मिळाली होती. कामरेड्डी या दुसऱ्या जागेवर रेवंत रेड्डी यांचा पराभव झाला होता. तेलंगणामध्ये 119 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये काँग्रेसने 64 जागा जिंकत तेलंगणात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. दरम्यान यामध्ये बीआरएसच्या 39 जागा कमी झाल्या.


हेही वाचा :


तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधीसोहळ्याला उपस्थित