Teachers Day 2023: माणसाला आयुष्यात यशाच्या शिखरावर नेणारा शिक्षकच असतो. शिक्षकाच्या आशीर्वादानेच आपण अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो. म्हणून 5 सप्टेंबरचा दिवस भारतात 'शिक्षक दिन' (Teachers Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या शिक्षक दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.. 


5 सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा केला जातो?


भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. भारतरत्न डॉ. राधाकृष्णन हे एक महान शिक्षक होते. जेव्हा शिष्यांनी त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करण्याचा विचार केला तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, "माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी, तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल. 1962 मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.


शिक्षक दिनाचे महत्व


डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे शिक्षक म्हणून देशाला दिली होती. शिक्षकांचा सन्मान करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. खरा शिक्षक समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतो असे सांगितले. माणसाला प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यायला शिकवते. एखाद्याचे जीवन घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे शिक्षकांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.


'या' देशांमध्ये 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होत नाही


भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जात असला तरी 1994 मध्ये युनेस्कोने शिक्षकांच्या सन्मानार्थ 5 ऑक्टोबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. रशियासारख्या विविध देशांमध्ये शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबरलाच साजरा केला जातो. ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, बांगलादेश, श्रीलंका, ब्रिटन, पाकिस्तान आणि इराणमध्येही वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.