Target Killing In Kashmir : काश्मीरमध्ये (Kashmir) पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची (Target Killing) घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांनी (Terrorist) एका काश्मिरी पंडिताची (Kashmirr Pandit Murder) गोळ्या झाडून हत्या केली आहे. काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची शनिवारी जम्मूमधील शोपियान परिसरात दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात असंतोष पसरला आहे. काश्मिरी पंडितांकडून टार्गेट किलिंग विरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत.


काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची हत्या


जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे. काश्मीर खोऱ्यातील शोपियान येथे ही घटना घडली आहे. काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सफरचंदाच्या बागेत जात असताना दहशतवाद्यांनी पूरण कृष्ण भट्ट यांना लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.


आतापर्यंत 24 जणांची हत्या


जम्मूतील काश्मिरी पंडितांना काश्मिरमध्ये जाण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केला आहे. या विरोधात काश्मिरी पंडितांकडून जम्मूमध्यो जोरदार निदर्शनं करण्यात येत आहेत. टार्गेट किंलिंग विरोधात काश्मिरी पंडित आक्रमक झाले आहेत. काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगबद्दल काश्मीरमधील लोकांमध्ये संताप आहे. काश्मीरी पंडितांकडून टार्गेट किलिंगविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. या वर्षात आतापर्यंत टार्गेट किलिंगमध्ये 24 जणांची हत्या झाली आहे.


सुरक्षेतील त्रुटी तपासल्या जातील : पोलीस 


पोलिस उपमहानिरीक्षकांनी याबाबत प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की, पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर एका दहशतवाद्याने गोळीबार केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. या क्लस्टरसाठी सुरक्षा व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. तिथे सुरक्षारक्षक तैनात आहेत, मात्र तरी ही चूक कशी झाली याचाही शोध घेतला जात आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शोपियानचे पोलीस उपायुक्त सचिन कुमार वैश यांनी सांगितले की, भट्ट यांच्या पार्थिव जम्मू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.