Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी (R.N. Ravi) यांनी ईडीने अटक केलेले  मंत्री व्ही. सेंथिल बालाजी (Senthilbalaji) यांना गुरुवारी मंत्रिमंडळातून बडतर्फ केले आहे. तामिळनाडू राजभवनाने याबाबत  एक निवेदन जारी केले आहे. मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांत गंभीर फौजदारी कारवाई सुरू आहे. या परिस्थितीत राज्यपालांनी त्यांची मंत्रिमंडळातून काढले आहे. राज्यपालांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाले आहेत. राज्यपालांनी अशी कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये राज्य सरकारविरुद्ध राज्यपाल, केंद्र सरकार असं राजकारण तापण्याची शक्यता आहे. 


सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सेंथिल बालाजी यांना 14 जून रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अटक केली होती. तपासादरम्यान छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सेंथिल यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही तामिळनाडू सरकारसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा आहे. सेंथिल यांना अटक केल्यानंतरही मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढले नव्हते. 


राज्यपाल कार्यालयाने काय म्हटले?


तामिळनाडूच्या राजभवनाने म्हटले की, व्ही. सेंथिल बालाजी हे मंत्रिमंडळात राहिल्याने निष्पक्ष तपासासह कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील घटनात्मक यंत्रणा बिघडू शकते.  ही परिस्थिती लक्षात घेता राज्यपालांनी थिरू व्ही. सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडाळातून तात्काळ प्रभावाने बडतर्फ केले आहे.


मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी काय म्हटले?


तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, कोणत्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा राज्यपालांना अधिकार नाही, आम्ही या प्रकरणी आता कोर्टात दाद मागणार आहोत. 


बालाजी यांची न्यायालयीन कोठडी 12 जुलैपर्यंत वाढवली


सेंथिल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थाची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कावेरी रुग्णालयात सेंथिल बालजी यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. तर, दुसरीकडे कोर्टाने 12 जुलैपर्यंत त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. या सुनावणीसाठी सेंथिल बालाजी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: