Tamil Nadu Kallakurichi News: तामिळनाडू : तामिळनाडूतील (Tamil Nadu News) कल्लाकुरिची जिल्ह्यात (Kallakurichi District) विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्यानं 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक जणांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भितीहीत्यांनी व्यक्त केली आहे. 


याप्रकरणी 49 वर्षीय (अवैध दारूविक्रेते) के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 200 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली दारू चाचणीसाठी पाठवली असता त्यामध्ये प्राणघातक मिथेन असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आणि ते थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितलं. 






तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, "कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दु:ख झालं आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. अटक रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे." 


ते पुढे बोलताना म्हणाले की, "अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेनं दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. समाजाला बरबाद करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोरपणे आळा घालण्यात येईल. तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि पीडित व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली."