Rahul Gandhi Gifting White T Shirt On Birthday: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी 19 जून रोजी 54वा वाढदिवस साजरा केला. राजकारण्यांपासून (Politicle Updates) ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल गांधींनी त्यांचा व्हिडीओ शेअर केला आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले. अशातच राहुल गांधींनी व्हिडीओमध्ये सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही दिलं. तो प्रश्न म्हणजे, राहुल गांधी नेहमी पांढरा टी-शर्ट का घालतात?
राहुल गांधी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला. "तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार", असं म्हणत राहुल गांधी यांनी व्हिडीओमधून सर्वांचे आभार मानले. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला अनेकदा विचारलं जातं की, मी नेहमी पांढरा टी-शर्ट का घालतो? तर त्यामागे एक खास कारण आहे. पांढरा टी-शर्ट माझ्यासाठी पारदर्शकता, दृढनिश्चय आणि साधेपणाचे प्रतीक आहे. ही मूल्य तुमच्या आयुष्यात कुठे आणि किती उपयुक्त आहेत? मला #WhiteTshirtArmy वापरून व्हिडीओमध्ये सांगा. मी तुम्हाला एक पांढरा टी-शर्ट भेट म्हणून देईन."
राजकीय नेत्यांकडूनही राहुल गांधींना शुभेच्छा
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बुधवारी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांचे आभार मानताना राहुल गांधी म्हणाले की, अखिलेशजी तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. यूपीतील दोन मुलं भारतीय राजकारणाला प्रेमाचं दुकान बनवतील. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तेजस्वी यादव यांनी असं लिहिलं की, तुम्ही उल्लेखनीय दूरदृष्टी आणि नेतृत्व दाखवलं आहे. तुम्हाला पुढील दीर्घ, आनंदी, निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा. तेजस्वी यादव यांच्या शुभेच्छांच्या मेसेजला रिप्लाय देताना राहुल गांधी यांनी लिहिलं की, तुझ्या शुभेच्छांसाठी धन्यवाद भावा, पुढचं लंच कुठे? कतला की रोहू? तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि इंडिया ब्लॉकचे सहयोगी एमके स्टॅलिन यांनी लिहिलं की, देशातील लोकांप्रती तुमचं समर्पण तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांनी यासाठी एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये शरद पवारांनी लिहिलं की, मी तुम्हाला निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. राहुल गांधी यांनी शरद पवारांचे आभार मानताना लिहिलं की, राजकारणावरील आणखी काही रंजक किस्से आणि गप्पांची मी वाट पाहतोय.
मोदी सरकार खूप कमकुवत; राहुल गांधी यांचा दावा
सत्ताधारी एनडीए संख्याबळाच्या बाबतीत खूपच कमकुवत असून, थोड्याशा गडबडीने सरकार कोसळू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. फायनान्शिअल टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'संख्या इतकी कमी आहे की सरकार खूप नाजूक आहे आणि अगदी लहान गडबड देखील ते खाली आणू शकते. मुळात एका (एनडीए) मित्रपक्षाला दुसरीकडे वळावे लागेल. एनडीएचे काही सहयोगी 'आमच्या संपर्कात आहेत', असा दावाही त्यांनी केला. पण कोण? राहुल यांनी कोणाचेही नाव उघड केले नाही, मात्र मोदी गोटात 'असहमती' असल्याचे सांगितले.