चेन्नई : बोअरवेलमध्ये जवळपास 80 तासांपासून अडकलेला तामिळनाडूतील 2 वर्षांचा सुजीत विल्सन आयुष्याच्या लढाईत पराभूत झाला आहे. तिरुचिरापल्लीतील एका गावात 90 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या सुजीतला सुरक्षित बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. सोमवारी (28 ऑक्टोबर) रात्री उशिरा बोअरवेलमधून सुजीतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत्यूच्या बोअरवेलमध्ये सुजीतने आधीच प्राण सोडले होते. त्याचा मृतदेह बाहेर काढला त्यावेळी त्यामधून दुर्गंधी येत होती. संपूर्ण देश सुजीत प्रार्थना करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही सुजीतसाठी प्रार्थना केली होती.

...आणि सर्व आशा संपल्या
तामिलनाडू वाहतूक विभागाचे प्रधान सचिव जे. राधाकृष्णन यांच्या माहितीनुसार, सुजीतचा मृतदेह अतिशय वाईट अवस्थेत बाहेर काढण्यात आला. तो 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. ज्या बोअरवेलमध्ये तो पडला होता, त्यामधून कुजलेला वास येऊ लागला होता. त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला.

पंतप्रधानांचं ट्वीट
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांच्याकडून मुलाच्या बचावकार्याबद्दल माहिती घेतली होती. त्यांनी या संदर्भात ट्वीटही केला होता. "सुजीत विल्सनसोबत माझ्या प्रार्थना आहेत. सुजीतला वाचवण्यासाठी सुरु असलेल्या बचावकार्याबाबतच्या माहितीसाठी माझी मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांच्याशी बातचीत झाली आहे. तो सुरक्षित राहावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत," असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं होतं.


80 तासांपेक्षा जास्त वेळाचं बचावकार्य
बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचावकार्य राबवण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुजीत सोमवारी बोअरवेलमध्ये बेशुद्ध झाला होता. त्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, राज्य पोलिस आणि स्थानीय प्रशासनाची अनेक पथकं कार्यरत होती. दोन वर्षांचा चिमुकला सुजीत सुरुवातीला 26 फूट खोल खड्ड्यात पडला होता. पण अचानक तो 70 फुटांपर्यंत खोल घसरत गेला.

सुरुवातीला सुजीतपर्यंत पोहोचण्यासाठी बोअरवेलजवळ खड्डा खोदण्यासाठी मशीन वापरण्यात आल्या. परंतु खडकाळ जमीन असल्याने हे कार्य रोखण्यात आलं. त्यानंतर बचाव दलाने 'बोअरवेल रोबो' या विशेष उपकरणाचा वापर केला, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही.