आग्रा : भारत सरकारच्या 'अतिथी देवो भव' अभियानाला उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री शहरात गालबोट लागलं आहे. भारतात फिरण्यासाठी आलेल्या स्विस जोडप्यासोबत एक अशी घटना घडलीय, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. फहेतपूर सिक्रीमध्ये या जोडप्याला स्थानिक तरुणांनी दगड आणि काठ्यांनी मारहाण केली. स्वित्झर्लंडच्या लुजानेमध्ये राहणाऱ्या या जोडप्यावर हल्ला झाला. रक्ताने माखलेले हे परदेशी पर्यटक रस्त्यावर पडले होते आणि येणारे-जाणारे व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होते.

काय आहे प्रकरण?
क्यून्टिन जेरमी क्लार्क गर्लफ्रेण्ड मेरी द्रोजसोबत मागील महिन्यात 30 सप्टेंबरला भारतात आला होता. रविवारी फतेहपूर सिक्री रेल्वे स्टेशनजवळ फिरत असताना, तरुणांच्या टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरु केला. "सुरुवातीला त्याने काहीतरी कमेंट केली, जी आम्हाला समजली नाही. त्यानंतर आमच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांनी आम्हाला जबरदस्तीने रोखलं," असं क्लार्कने सांगितलं.

यानंतर टोळक्याने दोघांवर हल्ला केला. पाठलाग करणाऱ्या तरुणांनी क्लार्कचं डोकं फोडलं. हल्ल्यात त्याच्या गर्लफ्रेण्डलाही गंभीर दुखापत झाली आहे. "आम्ही रक्ताने माखलेले तसेच रस्त्यावर पडलो होतो आणि तिथून जाणारे-येणारे लोक उपचार करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होते," अशी प्रतिक्रिया क्लार्कने दिली.



दगड-काठ्यांनी मारहाण
"आमच्या विरोधानंतरही तरुणांनी पाठलाग करणं थांबवलं नाही. संपूर्ण रस्त्यात ते आमचे फोटो घेत होते आणि मेरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. जेवढं आम्हाला समजलं त्यानुसार, टोळक्याला आमचं नाव आणि आमच्या देशाबद्दल जाणून घ्यायचं होतं. त्यांना आम्हाला दुसऱ्या ठिकाणी न्यायचं होतं, पण आम्ही नकार दिला. यानंतर त्यांनी दगड आणि काठ्यांनी हल्ला केला. मला वाचवण्यासाठी मेरी आड आली तर त्यांनी तिलाही मारलं," असं क्लार्कने सांगितलं.

क्लार्कच्या श्रवणशक्तीवर परिणाम : डॉक्टर
क्यून्टिन जेरमी क्लार्क आणि मेरी द्रोजवर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहे. क्लार्कला आता एका कानाने कमी ऐकायला येतं, असं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

परराष्ट्र मंत्री संतापल्या, राज्य सरकारकडून उत्तर मागितलं
दरम्यान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परदेशी पर्यटकांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध केला आहे. तसंच राज्य सरकारकडून या प्रकरणी उत्तर मागितलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी रुग्णालयात जाऊन स्विस पर्यटकांची भेट घेणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आग्रा पोलिस स्टेशनमध्ये चार अज्ञातांवर गुन्हा दाखल एका आरोपीला अटक केली आहे.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/923397853463986176

पाहा व्हिडीओ