नवी दिल्ली: नजरचुकीने पाकिस्तानात गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण यांना भारताच्या लष्करी न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोषी धरण्यात आलं आहे.

चंदू चव्हाण हे मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत.

गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानवर 28 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरला चंदू चव्हाण नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत गेले. मात्र भारत सरकारने पूर्ण ताकद पणाला लावून चंदू चव्हाण यांना या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 21 जानेवारीला भारतात आणण्यात आलं.

चार महिने पाकिस्तानात छळ, आता भारतात तीन महिने जेल

मात्र भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्यामुळे, लष्करी कोर्टाने चंदू चव्हाण यांना दोषी धरत, तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली.

न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली असली, तरी त्यावर अंतिम शिक्कमोर्तब होणं बाकी आहे. संबंधित अधिकारी/कार्यालय या शिक्षेचा कालावधी कमी-जास्त करुन, शिक्षेला अंतिम रुप देतील.

जर चंदू चव्हाण यांच्या तीन महिन्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली, तर साधारण 4 महिने पाकिस्तानी जेलमध्ये काढणाऱ्या चंदू चव्हाण यांना, भारतातही तीन महिने जेलमध्ये राहावं लागणार आहे.

आधीच पाकिस्तानने चंदू चव्हाण यांचं प्रचंड हाल केलं होतं. त्यातून चंदू पूर्णपणे सावरले आहेत की नाही याची कल्पना नाही, पण त्यातच त्यांना दोषी धरत शिक्षा सुनावल्याने, अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

चंदू चव्हाण यांना परत आणलं

चंदू मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे आहेत. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. ते जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. 29 सप्टेबरला चंदू यांनी चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर ते पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागले होते. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं होतं. 21 जानेवारीला चंदू भारतात परत आले होते.

चंदू चव्हाणला भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चंदू चव्हाणला मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. अखेर पाकिस्तानने चंदू चव्हाणची सुटका केली.

कोण आहेत चंदू चव्हाण?

चंदू चव्हाण मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले. 22 वर्षीय चंदू यांनी सीमा ओलांडण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे.

संबंधित बातम्या

पाकिस्तानकडून भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका 

पाकच्या तावडीतून सुटलेला जवान चंदू चव्हाण उद्या धुळ्यात परतणार!


भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली 


22 वर्षांचा चंदू चव्हाण, भाऊही मिलिट्रीत, लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं