मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आता नोकऱ्यांवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसात देशभरातील 1100 कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. कंपनीने ई-मेलद्वारे कपातीची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. त्याआधी स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोने आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती.


फूड डिलिव्हरी व्यवसायावर मोठा परिणाम
स्विगीचे सहसंस्थापक श्रीहर्ष माजेती यांनी सोमवारी (18 मे) एका पत्रात म्हटलं की, "फूड डिलिव्हरी व्यवसायावर खोल परिणाम झाला आहे आणि येत्या काही दिवसात हा परिणाम कायम राहिल. मात्र आगामी काळात हा व्यवसाय रुळावर येईल, अशी आशा आहे. परंतु आम्हाला आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची आणि येत्या काळात कोणत्याही प्रकारच्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी कपातीची गरज आहे."


झोमॅटो 13 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; तर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात


क्लाऊड किचन व्यवसायावर सर्वाधिक परिणाम
सर्वाधिक परिणाम कंपनीच्या क्लाऊड किचन बिझनेसवर झाल्याचं श्रीहर्ष माजेती यांनी सांगितलं. "तसंच जे व्यवसाय पूर्णत: अस्थिर होण्याची शक्यता आहे किंवा पुढील 18 महिन्यांपर्यंत त्यांचा काहीच उपयोग नसेल, ते व्यवसाय आम्ही बंद करणार आहोत," असंही माजेती यांनी स्पष्ट केलं. क्लाऊड किचन म्हणजे असं स्वयंपाकघर जिथे ऑनलाईन ऑर्डरच्या आधारावर अन्नपदार्थ बनवून ऑनलाईन माध्यमातूनच डिलिव्हरी केली जाते. या स्वयंपाकघरांचं स्वत:चं कोणतंही रेस्टॉरंट नसतं.


तीन महिन्यांचा पगार मिळणार
श्रीहर्ष माजेती यांनी सांगितलं की, "ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल, त्यांना कमीत कमी तीन महिन्यांचा पगार, अॅक्सिलिरेटेड वेस्टिंग, डिसेंबरपर्यंत आरोग्य विमा आणि कंपनीत त्यांनी जेवढी वर्षे काम केलं, त्यात प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचं अतिरिक्त पगार दिला जाईल."