चेन्नई : इन्फोसिसची कर्मचारी स्वातीच्या हत्याप्रकरणात नवाच थरार अनुभवास आला. तामिळनाडू पोलिसांनी स्वातीच्या मारेकऱ्याचा छडा लावला. पण पोलीस पकडण्यासाठी आल्याचं पाहताच, इंजिनिअर आरोपीने स्वत:ही गळा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याच आरोपीने गेल्या शुक्रवारी भरदिवसा रेल्वे स्टेशनवर स्वातीची गळा चिरुन हत्या केली होती.


 

राम कुमार असं या आरोपीचं नाव असून, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

काय आहे प्रकरण?

चेन्नईतील एका रेल्वे स्थानकावर इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्रांनी हत्या झाली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेदरम्यान रेल्वेस्थानकावर गर्दी होती. मात्र, या तरुणीला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. शिवाय, जवळपास दोन तास मृतदेह रेल्वेस्थानकावरच पडून होतं. स्वाती असं या मृत तरुणीचं नाव आहे.

 

काय झालं प्लॅटफॉर्मवर?

 स्वाती जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी होती. त्यावेळी काळी पँट परिधान केलेला एक तरुण मागून आला आणि स्वातीशी काही वेळ बोलला. त्यानंतर आपल्या बॅगमधून धारदार शस्त्र काढून तिच्यावर हल्ला केला. त्यातच स्वातीचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

चेहरा आणि गळ्यावर वार 

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार केले गेले. प्लॅटफॉर्मवर काही अंतरापर्यंत रक्त पसरलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे प्लॅटफॉर्मवर गर्दी असतानाही, कुणी वाचवण्यासाठी पुढे आला नाही. किंवा हत्या करणाऱ्या तरुणाला पकडण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही.

 

आरोपीचा छडा

याप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी आठवडाभरातच आरोपीचा शोध लावला. चेन्नईपासून 630 किमी अंतरावरील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील सेंगोट या गावात आरोपी असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. मात्र आपल्या दिशेने पोलिस येत असल्याचं दिसताच, 24 वर्षीय राम कुमारने स्वत:च्या गळ्यावर चाकू फिरवला.

 

हत्येचं कारण

संगोटे येथे राहणारा राम कुमार नोकरीनिमित्त चेन्नईत आला होता. स्वाती ज्या परिसरात राहते, तिथेच राम कुमारही राहात होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो इथे वास्तव्यास होता. मात्र या दोघांची ओळख होती का, किंवा हत्येचं काय कारण होतं, याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

संबंधित बातमी


चेन्नईत भरदिवसा इन्फोसिसच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या