नवी दिल्ली/वाशिम: आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटियन फोर्समध्ये भरतीच्या नावाखाली अनेक मराठी तरुणांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील माधव इंगोले या तरुणानं पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे.


 

आयटीबीपीमध्ये इतर अतिरिक्त सेवांसाठी वाशिम आणि परिसरातल्या अनेक मराठी तरुणांनी अर्ज केले. त्यांची परीक्षा झाली, मुलाखती झाल्या. पण नंतर जे पत्र त्यांना आलं, त्यात 25 हजार रुपये भरा, तरच तुमचं ट्रेनिंग सुरु होईल असं सांगण्यात आलं. अगदी आयटीबीपीच्याच लोगोचा, नावाचा वापर करुन हे पत्र आल्यानं या मुलांनी पैसे भरले. मात्र तरीही काही कॉल आला नाही. शेवटी परत एक मेसेज आला की भरती झाल्यानंतर तुमची पाच लाखांची पॉलिसी काढण्यात येणार आहे. त्यासाठी 10 टक्के रक्कम म्हणजे 50  हजार रुपये तुम्हाला आगाऊ भरावे लागतील.

 

गरीब घरातल्या या मुलांनी आपल्या घरातली जमीन विकून नोकरीच्या आशेने हे पैसे भरले. मात्र पुढे काहीच होत नाही म्हटल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

 

स्पेशल 26 या हिंदी चित्रपटातल्या सारखाचा हा प्रकार अनेक मराठी मुलांच्या बाबतीत घडलाय. अमित कुमार या व्यक्तीच्या नावावर त्यांना बँकेत पैसे भरायला सांगितले जात होते. मात्र हा अमित कुमार नेमका कोण आहे याचा पत्ता अजून लागलेला नाही.

 

वाशिम आणि परिसरातल्या अनेक मुलांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. आयटीबीपीच्या दिल्ली ऑफिसात येऊन या मुलांनी आपलं गा-हाणं मांडलं. मात्र त्यांना अजूनही न्याय मिळू शकलेला नाही.

 

देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी निगडीत एका महत्वाच्या संस्थेच्या नावावर असे फसवणुकीचे प्रकार होणं गंभीर आहे.