मुंबई : स्वामी विवेकानंद या भारताच्या महान सुपुत्राने देशाचं नाव सातासमुद्रापार नेलं, भारतीय संस्कृतीच्या खऱ्या अर्थाने जगाला ओळख करून दिली. त्या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाशी संबंधित सर्वात महत्त्वाची घडामोड आजच्याच दिवशी घडली होती. 19 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील धर्मपरिषदेला संबोधित करताना विवेकानंदांनी 'माय अमेरिकन ब्रदर्स अॅन्ड सिस्टर्स' अशी सुरूवात केली आणि सभागृहात टाळ्यांची एकच कडकडाट झाला. तसेच भारतीय क्रिकेट विश्वासाठीही आजचा दिवस महत्त्वाचा असून युवराज सिंहने सहा चेंडूवर सहा षटकार मारले आणि विक्रम केला. 


या घडामोडींसह आजच्या दिवशी इतर महत्त्वाच्या कोणत्या घडामोडी घडल्या त्या जाणून घेऊयात, 


1581 -  शिखांचे चौथे गुरू राम दास यांचे निधन (Sikh Guru Ram Das)


शिखांचे चौथे गुरू राम दास यांचे आजच्या दिवशी, 1581 साली निधन झालं होतं. परकीय आक्रमणामध्ये पंजाबधील अनेक शहर जमीनदोस्त होत असताना गुरू राम दास यांनी रामसर (Ramsar) हे शहर वसवलं होतं. हेच शहर आज शिखांचे पवित्र शहर म्हणजे अमृतसर (Amritsar) म्हणून ओळखलं जातं. 


1803 - दुसऱ्या अॅंग्लो- मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव 


ब्रिटिश आणि मराठ्यांच्यात झालेल्या दुसऱ्या अॅंग्लो- मराठा युद्धात (Second Anglo Maratha War) असाये या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला. या युद्धात ब्रिटिशांच्या सैन्याचे नेतृत्व सर ऑर्थर वेलस्ली याने केलं. या युद्धानंतर ब्रिटिशांनी दिल्लीवर ताबा मिळवला, तसेच भारताचा मोठा भूभाग ब्रिटिशांच्या हाती गेला. 


1893 - स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथे ऐतिहासिक भाषण (Swami Vivekananda Chicago Speech)


स्वामी विवेकानंद यांनी आजच्याच दिवशी 1893 साली अमेरिकेतल्या शिकागो या ठिकाणी भरलेल्या धर्मसंसदेत भाषण केलं. विवेकानंद यांनी 'माय अमेरिकन ब्रदर्स अॅन्ड सिस्टर्स' अशी भाषणाची सुरुवात केल्यानंतर त्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. भारतीय अध्यात्माची आणि संस्कृतीची जगाला खऱ्या अर्थाने ओळख करुन देण्याचं काम स्वामी विवेकानंद यांनी केलं. 


1893 - महिलांना सर्वप्रथम मतदानाचा हक्क (History of Women's Suffrage New Zealand) 


न्यूझिलंड या देशाने जगात सर्वात पहिल्यांदा महिलांना मतदानाचा हक्क प्रदान केला. 19 सप्टेंबर 1893 साली तशी घोषणा करण्यात आली. 


1950 मध्ये मेक्सिकोमध्ये भूकंप 


मेक्सिकोसाठी 1950 सालातील 19 सप्टेंबर हा काळा दिवस ठरला होता. आजच्या दिवशी मेक्सिकोच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप झाला होता. हा भूकंप जवळपास 20 ते 25 मिनीटे सुरू होता. या भूकंपात मेक्सिकोतील दहा हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर लाखो लोक जखमी झाले होते. 


1965- सुनिता विल्यम्स यांचा जन्मदिन 


सुनिता विल्यम्स (Sunita Williams) या मूळच्या भारतीय वंशाच्या महिला आहेत. अमेरिकेतील नासा या अंतराळ संस्थेच्या वतीने अवकाशात भरारी घेणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला ठरल्या. एक महिला अंतराळ प्रवासी म्हणून त्यांनी 195 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम त्यांनी केला. 


2007- युवराज सिंह याचे सहा चेंडूवर सहा सिक्स (Yuvraj Singh Six Sixes in Over) 


आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी, 2007 साली युवराज सिंहने क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता. इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या टी20 सामन्यात त्याने सहा चेंडूवर सहा सिक्स लगावले होते. त्या सामन्यात त्याने 12 चेंडूंमध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. 


2008- दिल्लीत बाटला हाऊस चकमक (Batla House Encounter Case)


आजच्या दिवशी 2008 साली भारतातील गाजलेली बाटला हाऊस चकमक घडली. दिल्लीतील बाटला हाऊस या ठिकाणी काही इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेचे दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ही कारवाई करत असताना दिल्ली पोलिसांचे धाडसी अधिकारी मोहन चंद शर्मा हे शहीद झाले.