नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. दरम्यान स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. इम्रान खान एवढे उदार असतील तर त्यांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला भारताच्या ताब्यात द्यावं, अशी मागणीही स्वराज यांनी केली.
पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कारवाई करावी. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घेतली आहे. त्यामुळे इम्रान खान उदार असतील तर त्यांनी मसूद अजहरला भारताच्या ताब्यात द्यावं, असंही स्वराज यांनी म्हटलं.
पाकिस्ताननं जैश ए मोहम्मदला केवळ देशात स्थान दिलं नाही, तर त्यांना पैसाही पुरवला आहे. ज्यावेळी भारताकडून 'जैश'वर कारवाई केली जाते, त्यावेळी दहशवादी गट भारतीय सीमांवर हल्ला करतात. एकीकडे मसूद अजहर आजारी असून घराबाहेर पडू शकत नाही, असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणतात. तर दुसरीकडे मसूद अजहर पाकिस्तानात नसल्याचं पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी सांगतात. त्यामुळे अशा दुहेरी भूमिकांमुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर येतो, असं स्वराज यांनी म्हटलं.
चीनच्या विरोधामुळे दहशतवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षित समितीनं फेटाळला आहे. जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाविरोधात चीनने मतदान केल्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने प्रस्ताव नाकारला.
VIDEO | मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही : यूएन | एबीपी माझा
संबंधित बातम्या
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान उदार असतील मसूद अजहरला भारताच्या ताब्यात द्या, सुषमा स्वराज यांची मागणी