पंतप्रधान मोदींनी सुरेश प्रभूंचा राजीनामा स्वीकारला तर नैतिक जबाबदारी स्वीकरत मंत्रिपदावरुन पायउतार होणारे ते तिसरे रेल्वेमंत्री ठरतील. यापूर्वी सर्वात अगोदर दिवंगत रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री आणि एनडीएच्या कार्यकाळात बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
लाल बहादूर शास्त्रींचा राजीनामा
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात लाल बहादूर शास्त्रींकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती. तामिळनाडूच्या अरियालूर येथे 27 नोव्हेंबर 1956 रोजी भीषण रेल्वे अपघात झाला होता. ज्यामध्ये जवळपास 142 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला.
नितीश कुमार यांचा राजीनामा
लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर तब्बल 43 वर्षांनी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत एखाद्या रेल्वेमंत्र्याने राजीनामा दिला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नितीश कुमार यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती. 1999 साली गैसाल येथे भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये 290 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान एनडीएच्या कार्यकाळात ममता बॅनर्जी यांनीही दोन रेल्वे अपघातांनंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा स्वीकारला नाही.
उत्कल एक्स्प्रेस आणि कैफियत एक्स्प्रेसचे अपघात
उत्तरप्रदेशात एका आठवड्यात सलग दुसरा मोठा रेल्वे अपघात झाल. दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेस डंपरला धडकली. यामुळे रेल्वे इंजिनसह 10 डबे रुळावरुन घसरले यामध्ये तब्बल 74 जण जखमी झाले आहेत.
उत्कल एक्स्प्रेसला अपघात
रविवारी उत्कल एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरुन 22 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसचे डबे घसरले. यानंतर रेल्वे बोर्ड अध्यक्ष आदित्य कुमार मित्तल यांनी राजीनामा दिला.
संबंधित बातम्या