Supreme Courts Strict Comment On Corruption : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)शहरी नक्षलवाद, भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान देशातील वाढत्या भ्रष्टाचाराबाबत जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, भ्रष्ट लोकं देशाला उद्ध्वस्त करत आहेत. तसेच ते पैशाच्या जोरावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटतात. गौतम नवलखा यांना न्यायालयीन कोठडीऐवजी नजरकैदेत ठेवण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने ही तोंडी टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असेही म्हटले की, आम्ही असे व्हिडीओ पाहिले आहेत, ज्यात लोकं निवडून आलेल्या प्रतिनिधींना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची चर्चा करतात.


भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कोण करणार? - सर्वोच्च न्यायालय


महाधिवक्ता एस. व्ही. राजू, राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (NIA) हजर झाले, त्यांनी या याचिकेला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, नवलखा यांच्यासारखे लोकं देशाला नष्ट करत आहे. राजू यांनी न्यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांना सांगितले की, भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवलखासारखे लोक देश नष्ट करू इच्छितात, ते माओवादी समर्थक आहेत आणि त्यांचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध आहेत.  हे निष्पाप लोकं नसून खऱ्या युद्धात सामील असल्याचा आरोप राजू यांनी केला. त्यावर न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने म्हटले की, तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे का? जे लोक भ्रष्ट आहेत ते या देशाला नष्ट करत आहेत. भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई कोण करणार? असे प्रश्न न्यायालयाने केले


'प्रतिनिधींना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची चर्चा'


खंडपीठाने म्हटले "आम्ही आमच्या तथाकथित निवडून आलेल्या प्रतिनिधींना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची चर्चा करतानाचा व्हिडीओ पाहिला आहे," मुद्दा असा आहे की तुम्ही त्यांचा बचाव करत नाही, याउलट भ्रष्टाचार वाढतच चालला आहे. हे लोकं केवळ मौजमजा करतात. त्यांच्याकडे पैशाच्या पिशव्या आहेत, ज्या तुम्हाला वाचविण्यात मदत करू शकतात.


न्यायालयाचा निर्णय देशाच्या हिताच्या विरोधात होऊ नये


यावर महाधिवक्ता म्हणाले की, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने राजू यांना केंद्राकडून निर्देश घेण्यास सांगितले आणि अटकेच्या विनंतीस परवानगी दिल्यास नवलखा यांच्यावर कोणत्या अटी लादल्या जाऊ शकतात हे सांगण्यास सांगितले. खंडपीठाने सांगितले, आम्ही तरी बघू, तुम्ही चौकशी करून परत या, म्हणजे आमचा निर्णय देशाच्या हिताच्या विरोधात होऊ नये. आपणही तितकेच जागरूक आहोत. जर (नवलखा) यांनी काही चूक केली तर तो त्याचे स्वातंत्र्य गमावेल.