PM Security Breach: पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्या. सूर्यकांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील आजच्या कामकाजात हे प्रकरण पहिल्या क्रमांकावर आहे.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीची बाब सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडली. सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना न्यायालयाकडून काय हवे आहे, अशी विचारणा केली. प्रत्युत्तरात मनिंदर सिंग म्हणाले की, खटल्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड भटिंडाच्या जिल्हा न्यायाधीशांकडे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश द्यावेत, सुप्रीम कोर्टाने याबाबत माहिती घ्यावी आणि या सुरक्षा त्रुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पंजाब सरकारला द्यावेत अशी मागणी केली.
राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी झालेल्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेच्या चुकीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनीदेखील या संदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा केली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल मागितला
केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून या प्रकरणी अहवाल मागितला आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत.
राजकारण तापले
बुधवारी झालेल्या या प्रकरणानंतर राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसने घातपात करण्याचा कट आखला होता असा गंभीर आरोप भाजपने केला. तर, पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यामागे निदर्शकांचे कारण नसून मोदींच्या सभेतील मोकळ्या खुर्च्या आहेत असा पलटवार काँग्रेसने केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Security Of Pm Narendra Modi : फक्त पंतप्रधान मोदींनाच SPG सुरक्षा? एका दिवसाच्या सुरक्षेचा खर्च किती?
- PM Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पोलिसांकडूनच चूक? पोलिसांनी आंदोलकांना मार्गाची माहिती लीक केल्याचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha