Supreme Court On LAC Tension : प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनकडून भारताच्या हद्दीत होत (India China) असलेल्या घुसखोरीच्या मुद्यावर दाखल याचिका सुप्रीम कोर्टाने (Suprme Court) फेटाळली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत (CJI U U Lalit) यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. हा मुद्दा सरकारच्या अखत्यारीत असून कोर्ट यावर सुनावणी करू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.


अभिजित सराफ यांनी ही याचिका दाखल केली होती. गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने चीनने घुसखोरी केली नसल्याचे म्हटले होते. मात्र, केंद्राने दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा याचिकेत केला होता. 


सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्या. एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे हे सरकारच्या धोरणाशी निगडीत आहेत. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. सीमेवरील चकमकी, संघर्ष, घुसखोरीसारखे मुद्दे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. राज्यघटनेतील अनुच्छेद 32 नुसार या गोष्टी येत नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली.


भारत-चीनच्या लष्करात संघर्ष


कोरोना काळात भारतासह संपूर्ण जग महासाथीच्या आजारासोबत दोन हात करत असताना चीनने लडाख पूर्वमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर आगळीक केली. चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. चिनी सैन्याच्या घुसखोरीला अटकाव करताना 15-16 जून 2020 दरम्यान भारत-चीन लष्करात संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवानांनी प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले होते. त्यानंतर, देशात संतापाची लाट उसळली होती. घटनेच्या काही दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या हद्दीत कोणी घुसखोरी केली नसल्याचे वक्तव्य केले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.


प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष ताबा रेषेत फरक काय?


प्रत्यक्ष नियंत्रण रेषा: प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LOC) ही दोन्ही देशांनी ठरवलेली असते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करणे, दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले जाऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये LOC आहे. LOC जवळील भागात दोन्ही देशातील नागरिकांच्या वसाहती असू शकतात. त्याशिवाय, सैन्यदेखील असू शकतात. 


प्रत्यक्ष ताबा रेषा: भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष ताबा रेषा आहे. भारत आणि चीनमध्ये 1993 मध्ये झालेल्या चर्चेनुसार प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) निश्चित करण्यात आली. या दोन्ही देशादरम्यान असलेल्या LAC जवळील 50 ते 100 किमीपर्यंतचा भाग हा मोकळा असतो. या भागात कोणत्याही देशाचे सैन्य नसते.