Supreme Court On Joshimath Land Subsidence : जोशीमठ प्रकरणावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी याचिकाकर्त्याला उत्तराखंड उच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. सुनावणीदरम्यान उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 


याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, उच्च न्यायालयात आधीच या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्याने आपले म्हणणे तिथेच मांडावे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी जोशीमठमधील लोकांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मालमत्तेचा विमा उतरवण्याची मागणी या याचिकेतून केली होती. याबरोबरच शंकराचार्यांनी आपल्या याचिकेतून हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी देखील केली होती. यासोबतच तपोवन-विष्णुगड वीज प्रकल्पावर बंदी घालण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. परंतु, न्यायालयाने त्यांत्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. 


"12 जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने याच विषयावर आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने तज्ञ समितीच्या स्थापनेवर उत्तर मागितले आहे. सरकार आणि एनटीपीसीने बांधकाम थांबवावे, असे  मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहेत. 
 
सर्वोच्च न्यायालयाने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिल्यानंतर त्यांचे वकील सुशील जैन आणि पीएन मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका ऐकावी अशी विनंती केली. परंतु सरन्यायाधीशांनी सांगितले की, पुनर्वसनासह तुम्ही मांडलेल्या मागण्यांसाठी तुम्ही उच्च न्यायालयात अर्ज करू शकता. तुम्ही अर्ज दाखल केला तर त्यावर लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती आम्ही उच्च न्यायालयाला करेन असे सरन्यायाधिशांनी म्हटले.   


 उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये जमीन खचत असल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. तेथील घरे, रस्ते आणि शेतात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. आतापर्यंत जोशीमठमधील शेकडो कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.


दरम्यान, जोशीमठ अजुनही खचत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरनं जोशीमठ शहराच्या सेटेलाईट इमेजेस प्रसिद्ध केल्या आहेत. या इमेजेसवरुन जोशीमठमध्ये जमीन खचण्याची प्रक्रिया कशी सुरू आहे, याचा अंदाज येतोय. जोशीमठ अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचं सॅटेलाइट इमेजमधून दिसून आलं आहे. इस्रोने फोटो जारी करताना सांगितलंय की, 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान जोशीमठमध्ये 5.4 सेमी भूस्खलनाची नोंद झाली आहे. एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जोशीमठमध्ये 9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याचं दिसून येतंय. एनएसआरसीनं गेल्या सांगितलं की, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यादरम्यान जोशीमठमध्ये वेगानं भूस्खलन होण्यास सुरुवात झाली आहे.


महत्वाच्या बातम्या 


Joshimath Sinking: जोशीमठ अजुनही खचतंय... अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेमी भूस्खलन, इस्रोकडून सॅटेलाइट इमेज जारी