मुंबई : केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रार्थनेवेळी म्हटल्या जाणाऱ्या संस्कृत श्लोकातील काही ओळींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या ओळी म्हटल्याने अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संस्कृत श्लोकातील संबंधित ओळी वगळण्याचा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'असतो मा सद्गमय' (असत्याकडून सत्याकडे चला) आणि 'ओम सहा नवावतु' (इश्वर आपलं संरक्षण आणि पालनपोषण करेल) या संस्कृत ओळींविषयी आक्षेप घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे रहिवासी असलेल्या विनायक शाह यांनी हिंदू ग्रंथातील या ओळी फक्त अल्पसंख्याकच नाही, तर नास्तिक (एथिस्ट), अज्ञेयवादी (अॅग्नॉस्टिक) आणि तर्कवादी (रॅशनलिस्ट) यांच्याही मूलभूत अधिकारांवर घाला घालत असल्याचं म्हटलं आहे.
'सकाळच्या वेळी हे संस्कृत श्लोक म्हणणं अनिवार्य केल्याने तरुण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होण्यात अडथळे येऊ शकतात' असं शाह यांनी याचिकेत म्हटलं आहे. या दोन्ही ओळी यापुढे प्रार्थनेत समाविष्ट कराव्यात की नाही, याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचे पाच न्यायाधीश घेणार आहेत.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मात्र याचिकेतील आरोपांना विरोध केला आहे. हिंदू ग्रंथांतील संबंधित श्लोकांमध्ये वैश्विक सत्य सांगण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची 'धार्मिक' अशी विभागवारी करणं चुकीचं ठरेल, असं मेहता म्हणाले. 'प्रामाणिकपणा नेहमी उपयुक्त असतो' यासारखं एखादं मूल्य इंग्रजीत शिकवलं, म्हणून त्याचा संबंध ख्रिस्ती धर्माशी जोडणंही चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
शाळेत 'त्या' संस्कृत ओळी अनिवार्य का? सुप्रीम कोर्टात याचिका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jan 2019 09:05 PM (IST)
'असतो मा सद्गमय' (असत्याकडून सत्याकडे चला) आणि 'ओम सहा नवावतु' (इश्वर आपलं संरक्षण आणि पालनपोषण करेल) या संस्कृत ओळींविषयी मध्य प्रदेशातील याचिकाकर्त्याने आक्षेप घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -