मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर शेअर करणाऱ्या भाजप कार्यकर्ती प्रियांका शर्माची सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. सुटका झाल्यानंतर प्रियांका शर्माने पत्रकार परिषद घेत याप्रकरणी माफी मागणार नसून केस लढणार असल्याचं जाहीर केलं.


सुप्रीम कोर्टानं मला काल जामीन मंजूर केला. मात्र कोर्टाच्या आदेशाच्या 10 तासांनंतरही माझी सुटका झाली नाही. या दरम्यान मला माझे कुटुंबीय आणि वकील यांनाही भेटू दिलं नाही. माझ्यावर वारंवार माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असं प्रियांका शर्माने सांगितलं.


प्रियांकाच्या सुटकेला उशीर झाल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारलं. प्रियांका शर्माची तातडीने सुटका करण्याचे आदेश काल सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र त्यानंतरही तिची सुटका होण्यास उशीर करण्यात आला. प्रियांकाच्या वतीने वरिष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टाला याबाबत माहिती दिली. याबाबत सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच प्रियांकाची तातडीने सुटका न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशा शब्दात कोर्टाने पश्चिम बंगाल सरकार फटकारलं.





काय प्रकरण आहे?


अमेरिकेत पार पडलेल्या मेटगाला या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हजेरी लावली होती. प्रियांकाने या फॅशन शोमध्ये विचित्र मेकअप केला होता. सोशल मीडियवरील मेमर्सनी मेटगालामधील प्रियांकाच्या फोटोमधील प्रियांकाचा चेहरा हटवून तिथे ममता बॅनर्जींचा चेहरा मॉर्फ करुन त्याचे मिम तयार केले. हे मिम सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. प्रियांका शर्मा यांनी हेच मिम फेसबुकवर शेअर केल्यामुळे पश्चिम बंगाल पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर प्रियांकाच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ढाल पुढे करत प्रियांकाने कोर्टासमोर तिची बाजू मांडली. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी सुरुवातीला प्रियांका शर्मा यांनी ममता यांची माफी मागावी, असं म्हटलं होते. परंतु प्रियांकाचे वकील नीरज किशन कौल यांनी त्यास विरोध केला. कौल म्हणाले की, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. एका छोट्या गोष्टीसाठी 25 वर्षांच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे, तसेच तिला माफी मागण्यास सांगितले जात आहे. जर प्रियांकाला माफी मागायला लावली तर, हे एक चुकीचे उदाहरण ठरेल. याचाच गैरफायदा घेत सर्वच सत्ताधारी पक्ष आपल्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना, नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवतील. त्यानंतर कोर्टाने माफीची अट मागे घेतली होती.