चंढीगड : हरयाणाच्या झज्जर जिल्ह्यात भाजप समर्थकाने काँग्रेसला मतदान करणाऱ्या चुलत भावावर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. या गोळाबारात राजा नावाचा युवक आणि त्याची आई जखमी झाली आहे. धर्मेंद्र असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे, जो घटनेनंतर फरार आहे.
झज्जरमधील सिलाना गावात मतदानाच्या दिवशी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावरुन रस्सीखेच सुरु होती. राजाला आरोपी धर्मेंद्रने भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र राजाने असं करण्यास स्पष्ट नकार दिला. तोच राग मनात ठेऊन धर्मेंद्रने सोमवारी सकाळी राजाच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळाबार केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राजाच्या आईलाही किरकोळ दुखापत झाली.
मात्र गोळाबारात राजा गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत राजाला रोहतकच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजाची आणि त्याच्या आईची प्रकृती स्थीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
गोळी झाडेलेली बंदूक अवैध असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांमार्फत समोर येत आहे. आरोपी धर्मेंद्र फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. धर्मेंद्र विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.