नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराला ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. निवडणुकीतील पराभव दिसत असल्यानेच ममता बॅनर्जींनी हिंसाचार घडवला असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला.
देशभर निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. या सहा टप्प्यांमध्ये निवडणूक होत असताना कुठेही हिंसाचाराची घटना समोर आलेली नाही. मात्र केवळ पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला तृणमूल काँग्रेसच जबाबदार असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी उघडपणे धमक्या देत आहेत, बदला घेण्याची भाषा करत आहेत. राजकीय नेत्यांना पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेण्यापासून रोखलं जात आहे, याबाबत अमित शाहांनी नाराजी व्यक्त केली.
ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केली
ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा भाजपने नाही, तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडल्याचा दावाही अमित शाह यांनी केला आहे. हिंसा झाली त्यावेळी विद्यासागर कॉलेजचं गेट बंद होतं, मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची तोडफोड कुणी केली? कॉलेजच्या आत कोण गेलं? कारण त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर होते, असं अमित शाहांनी सांगितल. निवडणुकीत पराभव दिसत असल्याने मतांच्या राजकारणासाठी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनकडून पुतळ्याची तोडफोड केल्याचा दावा अमित शाहांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये 23 हून अधिक जागा जिंकणार
भाजपच्या रोड शो दरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तीन वेळा हल्ला केला. भाजपच्या कार्यकर्त्यांना उकसवण्याचा प्रयत्न तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. तृणमूलला पराभव समोर दिसत असल्याने भाजपाला रोखण्यासाठी हिंसेचा वापर होत आहे. मात्र भाजप संपूर्ण देशभरात 300 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहे. 23 मे रोजी ममता बॅनर्जी यांचे दिवस संपणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप 23 पेक्षा अधिक जागा जिंकणार, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
कोलकातामध्ये तुफान राडा
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये तुफान राडा झाला. तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषद आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं. कोलकात्यातील धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून अमित शाह यांच्या रोड शोला सुरुवात झाली. मेडिकल कॉलेजजवळ हा रोड शो आल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'गो बॅक'चा नारा दिल्याने भाजप कार्यकर्ते चिथावले. यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही झाली. यानंतर रोड शो आवरता घेत अमित शाह यांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे ते सुखरुप आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीचार्ज करुन कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवलं.
आणखी वाचा