नवी दिल्ली : महात्मा गांधींना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे अशा पुरस्कारांपेक्षा अनेक पटींनी मोठे आहेत. तसेच केंद्र सरकारला यासंदर्भात निर्देश देता येणार नाहीत.
सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या खंडपीठाने याप्रकरणी आज सुनावणी घेतली. सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशातील जनतेच्या नजरेत महात्मा गांधी हे कोणत्याही औपचारिक सन्मानापेक्षा खूप मोठे आहेत. ही याचिका करण्यामागे याचिकाकर्त्याच्या भावनेचा आम्ही सन्मान करतो. परंतु या याचिकेचा स्वीकार करता येणार नाही.
कोर्टाने यावर म्हटले आहे की, केंद्र सरकारला यासंबंधी निर्देश देणे शक्य नाही. महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे ते या अशा सन्मानापेक्षा खूप मोठे आहेत. लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली आहे, ती या सर्व पुरस्कारांपेक्षा मोठी आहे.
मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. हादेखील गांधीजींचा मोठा सन्मान आहे. गेल्या वर्षी गांधीजींची 150 वी जयंती साजरी केली गेली.