मुंबई : 'ब्रूस अलमायटी' सिनेमात जिम कॅरी त्याच्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी चक्क चंद्राला पृथ्वीच्या जवळ आणतो. पण मंडळी, अशा सुपरमूनसाठी तुम्हाला सुपरपॉवर कमवण्याची गरज नाही. कारण हा चंद्र स्वतःहून आपल्या साक्षीला येणार आहे. खगोलप्रेमींना संध्याकाळी पाच  वाजल्यापासून 'सुपरमून' पाहण्याची संधी मिळणार आहे.


चंद्र इतका मोठा दिसण्याचं कारण काय?

आज रात्री सुपरमून आपल्या अवकाशात अवतरणार आहे. नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा, नेहमीपेक्षा जास्त चमकदार, नेहमीपेक्षा 30 टक्के प्रखर, असं आज चंद्राचं दर्शन असेल. चंद्र सुमारे 8.09 वाजता पृथ्वीपासून 3,56,111 किमी अंतरावरुन जाणार आहे.

 

1948 नंतर चंद्र पहिल्यांदाच मोठा दिसणार

यापूर्वी भारत स्वतंत्र झाल्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे 1948 साली इतका मोठा चंद्र आपल्या भेटीला आला होता. यानंतर 2034 नंतर हा अद्भुत दृश्य पाहायला मिळणार नाही.

'सुपरमून' शब्दाचा वापर कधी?

अंतराळवीर रिचर्ड नोएल यांनी 30 वर्षांपूर्वी सुपरमून शब्दाचा वापर केला होता. अशा परिस्थितीत चंद्र पृथ्वीच्या फार जवळ येतो. यावेळी चंद्र अधिक चमकदार आणि मोठा दिसतो. यालाच सुपरमून म्हणतात. आता 25 नोव्हेंबर 2034 रोजी एक्स्ट्रा सुपरमून असेल. तर 6 डिसेंब 2052 रोजी चंद्र पृथ्वीपासून 3,56,425 किमी अंतरावर असेल.

कुठे दिसणार, कोणत्या दिशेला?

चंद्राचं हे सौंदर्य पाहण्यासाठी सूर्यास्तानंतर पूर्व दिशेला सुमारे आठ वाजता पाहा. आज जिथे असाल, तिथून फक्त क्षितीजाकडे एक कटाक्ष टाकायला विसरु नका. कारण रोजच्या रोज बदलणाऱ्या या जगात, क्वचितच बदलणारं कुणीतरी आहे, त्याला पाहायला विसरु नका!