गाझीपूर (उत्तर प्रदेश): पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर गंगा नदीत नोटांचा खच पडला आहे. पण गंगेत नोटा टाकून पाप धुतलं जाणार नाही, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील भाजपच्या परिवर्तन रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते.


नोटाबंदीच्या निर्णयामुळे गंगा नदीत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा टाकलेल्या आढळल्या. याबाबत मोदी म्हणाले की, "गंगामध्ये नोटा टाकून तुमचं पाप धुतलं जाणार नाही. जो काळा पैसा गंगेत टाकायला येईल, तो जर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदा झाला, तर त्याची चौकशी नक्कीच होणार. कारण त्यांनी हा काळा पैसा गरीबांना लुटूनच कमावला आहे."

काळा पैसावाले झोपेच्या गोळ्या घेता आहेत!

काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. जनतेकडून या निर्णयाचं स्वागत होत असताना, विरोधक मात्र त्यावर टीका करत आहेत. या टीकेला उत्तर नरेंद्र मोदी म्हणाले की, गरीब जनता सुखाची झोप घेत आहे, पणा काळा पैसा असणारे झोपेच्या गोळ्या खात आहेत.

जनतेच्या त्रासाची परतफेड विकासाच्या रुपात करेन : मोदी

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने, नागरिकांची पैसे बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी धावपळ सुरु आहेत. पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आहेत. यावर मोदी म्हणाले की, "जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याची मला कल्पना आहे. पण तुमच्याच भल्यासाठी मी प्रत्येक काम करत आहे. जनतेला होणाऱ्या अडचणींचा मलाही त्रास होत आहे. पण या त्रासाची परतफेड विकासाच्या रुपाने करेन. तुम्ही मला देशातील सर्व काळा पैसा संपवण्यासाठी सांगितलं, तर मी जे करतोय, ते चुकीचं आहे का? पण सगळ्यात जास्त अडचणी काळा पैसा असणाऱ्यांना होत आहे, त्यांना काही सांगताही येत नाही."

काँग्रेसने चारआणे बंद केले, मी हजाराची नोट रद्द केली : मोदी
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर काँग्रेस या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहे. पण काँग्रेसने जनतेची चिंता करु नये, जनतेसाठी मी दिवस-रात्र एक करत आहे. काँग्रेसने त्यांच्या ताकदीप्रमाणे चारआणे बंद केले, मी हजार रुपयाची नोट रद्द केली, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

'पंडीतजींचं अपूर्ण काम मी पूर्ण करणार!'

ताडीघाट पुलाचा उल्लेख 1962 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात झाला होता. पंडीत नेहरु यांच्यानंतर अनेक सरकारं आली आणि गेली, नेते आणि गेल, पण गंगा नदी पार करण्यासाठी कोणतीही व्यवस्था झाली नाही. 2016 पर्यंत या पुलाचं काम सुरु झालेलं नाही. पण नेहरुंच्या जयंतीला त्यांचं अपूर्ण काम पूर्ण करण्यास मी सुरुवात केली आहे. ते काम वेळेत पूर्ण करुन दाखवेन, असं मोदी म्हणाले.