Sukhvinder Singh Sukhu : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. फक्त याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडने सखू यांच्या नावाला मान्यता दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे येथे सरकार स्थापन करण्यासाठी  काँग्रेसच्या बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. 


हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या 68 जागांपैकी काँग्रेसला 40 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय तीन जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी कोणत्याही नेत्याला हिमाचलसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवले नव्हते. परंतु, सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आता मुख्यमंत्र्यांबाबत चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. 


 कोण आहेत सुखविंदर सिंग सुखू? 


हिमाचल प्रदेशातील नादौन विधानसभा मतदारसंघातून सुखविंदर सिंग सुखू यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांनी भाजपच्या विजय कुमार यांचा 3,363 मतांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुखू हे आघाडीवर होते. सुखविंदर सिंग यांना 50.88 टक्क्यांसह 36142 मते मिळवली तर भाजपच्या विजय कुमार यांना 46.14 टक्क्यांसह 32,779 मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार शांकी ठुकराल यांना केवळ 1,487 मते मिळाली. 


सुखविंदरसिंग सुखू हे हिमाचल प्रदेशच्या सध्याच्या राजकारणातील आघाडीचे नाव आहे.  त्यांचा जन्म 27 मार्च 1964 रोजी हिमाचल प्रदेशातील नादौन येथे झाला. आता ते काँग्रेसकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.  सुखविंदर सिंग सुखू यांनी नादौन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पुढे हिमाचल प्रदेश विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली. 


2003 मध्ये पहिल्यांदा आमदार 


सुखविंदर सिंग सुखू हे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. सखू हे 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखही होते. सुखविंदर सखू यांनी आतापर्यंत 5 वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून त्यापैकी 4 वेळा त्यांनी विजय मिळवला आहे. 2003 मध्ये नौदान विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर सखू यांनी 2007, 2017 च्या निवडणुकीत विजय मिळवला. 2013 मध्ये ते हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिले आहेत.    


महत्वाच्या बातम्या


Himachal Pradesh Election Winning Candidate List: हिमाचलवर काँग्रेसचा कब्जा, अशी आहे विजयी उमेदवारांची यादी