CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Maan) यांच्यावर धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. दारुच्या नशेत असल्यानं भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) नेते सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी केला आहे. या आरोपामुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना हा प्रकार घडल्याची माहिती देण्यात आली आहे.  मान मद्यधुंद अवस्थेत असल्यानं त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचे बादल यांनी म्हटलं आहे.  मात्र, आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप निराधार असल्याचं आपने म्हटलं आहे.


मान यांच्यामुळे विमानाला तब्बल चार तास उशीर


पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मान यांनी जास्त दारु प्यायल्यानं एअरलाइन्सने त्यांना खाली उतरवले. मात्र, या आरोपात काही तथ्य नसल्याचे आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे. भगवंत मान जर्मनीला गेले होते. तिथून परत येताना हाप्रकार घडल्याचे बादल यांनी सांगितले. तसेच मान यांच्यामुळे विमानाला तब्बल चार तास उशीर झाल्याचे बादल यांनी म्हटलं आहे. पंजाब सरकारच्या वतीनं अद्याप याबाबत कोणतही वक्तव्य केलं नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी होत आहे. भगवंत मान जास्त नशेत असल्याने त्यांना विमानातून खाली उतरवल्याचे काही रिपोर्ट्स येत आहेत. त्यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही भगवंत मान गैरहजर राहिले होते. या घटनेने जगभरातील पंजाबींना लाज वाटत असल्याचं सुखबीर सिंग बादल यांनी म्हटलं आहे.






लुफ्थांसा एअरलाईन्सचे निवेदन 


या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना लुफ्थांसा एअरलाईन्सच्या वतीने मात्र अधिकृत निवदेन जारी करण्यात आलं आहे. आमचं फ्रॅंकफर्ट ते दिल्ली या मार्गावरील विमान हे नियोजित वेळेपेक्षा उशीरा निघालं तसेच एअरक्राफ्ट बदल करण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे हे विमान उशीर लागला असं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 


 




विरोधकांकडून खोटा प्रचार, मान ठरलेल्या वेळत परत आलेत


दरम्यान, या प्रकाराबाबत आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीला परतले आहेत. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री मान यांनी 18 सप्टेंबर रोजी जर्मनीहून फ्लाइट घेतली होती. त्यानुसार 19 सप्टेंबरला ते दिल्लीला परतले आहेत. विरोधकांनी केलेले आरोप निराधार असून ते खोटा प्रचार करत असल्याचे सिंग यांनी म्हटलं आहे.


 


महत्त्वाच्या बातम्या: