Sugar Production : यावर्षी देशाच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) झाला आहे तर काही भागात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. एल निनोच्या (EL Nino) प्रभावामुळं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. दरम्यान, या स्थितीमुळं यावर्ष साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) घट येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या सर्व अफवा असून, 2023-24 हंगामात साखरेच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम होणार नाही. देशात साखरेचा तुटवडा भासणार नसल्याची माहिती नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) ने दिली आहे.
महाराष्ट्र वगळता इतर ऊस उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये एल निनोचा मान्सूनवर परिणाम झाला आहे. त्यामुळं ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं साखरेच्या उत्पादनातही घटीचा अंदाज आहे. मात्र, इतर ऊस उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळं ऊसाच्या वाढीस मदत झाली आहे. याचा परिणाम साखरेचं उत्पादन तिथे वाढ णार असल्याची माहिती नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडनं दिली आहे.
एल निनोच्या प्रभावामुळं देशात साखरेचा तुटवडा भासणार असल्याच्या अफवा असल्याचे NFCSF ने म्हटलं आहे. साखरेचा हंगाम अद्याप सुरु व्हायचा आहे. यंदा साखरेचा हंगाम हा ऑक्टोबर किंवा सप्टेंबर महिन्यात चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुटवडा भासणार आहे, असं म्हणणं योग्य ठरणार नसल्याचंही NFCSF ने म्हटलंय. महाराष्ट्र वगळता इतर सर्व ऊस उत्पादक राज्यांमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तराखंड या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळं ऊसाची वाढ होण्यास मदत झाली असल्याची माहिती NFCSF चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.
महाराष्ट्रात चालू सप्टेंबर महिन्यात पावसाला सुरुवात, ऊसाची वाढ होण्यास मदत
कर्नाटकमध्ये साखरेचं निव्वळ उत्पादन 3.5 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची भीती होती. पण तिथं प्रत्यक्षात 405 दशलक्ष टनांपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज असल्याची माहिती प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे ऊस आणि साखर उत्पादक राज्य आहे. या राज्यात मागील वर्षीपेक्षा यंदा साखरेचं उत्पादन वाढण्याचा अंदाज असल्याची माहिती नाईकनवरे यांनी दिली. महाराष्ट्रात ऑगस्ट महिना कोरडा गेला आहे. त्यानंतर चालू सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं ऊसाची वाढ होण्यास मदत होमार आहे. त्यामुळं साखरेचं उत्पादन देखील वाढण्यास मदत होईल असे नाईकनवरे यांनी सांगितले.
ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ
ज्या भागात ऊस पिकावर हवामानाचा परिणाम झाला आहे. त्या ठिकाणी गाळप करता येण्याजोगा ऊस कमी होण्याची शक्यता आहे, अशा भागात ऊस गाळपासाठी भारत विशिष्ट प्रमाणात कच्ची साखर आयात करू शकतो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये ऊसाची गाळप क्षमता वाढली आहे. त्यामुळं गाळपासाठी ऊसासोबत कच्च्या साखरेचा वापर केल्यास कारखान्यांना आर्थिक स्तरावर चालना मिळेल. तसेच साखरेचे निव्वळ उत्पादन वाढण्यास मदत होईल. दरम्यान, कृषी मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 सप्टेंबरपर्यंत देशात ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्र हे 59.91 लाख हेक्टर होते. जे मागील वर्षीच्या तुलनेत थोडे जास्त आहे. मागील वर्षी याच कालावधीत 55.65 लाख हेक्टर होते.
महत्त्वाच्या बातम्या: