Subrata Mukherjee Passes Away: पश्चिम बंगालचे (West Bengal) मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रत मुखर्जी (Subrata Mukherjee) यांचे आज निधन झालंय. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी कोलकाता येथील रवींद्र सदनमध्ये अंतिम दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुब्रत मुखर्जी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. "मला विश्वास बसत नाही की ते आता आमच्यात नाहीत. ते पक्षाचे समर्पित नेते होते. त्यांच्या निधानाने आमचे वैयक्तिक नुकसान झालंय, असं त्यांनी म्हटलंय.
सुब्रत मुखर्जी यांना छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना एसएसकेएममध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयातील कार्डिओलॉजीच्या आयसीसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या धमनीत स्टेंट टाकल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांच्या प्रकृती विचारपूस करण्यासाठी ममता बॅनर्जी गुरूवारी रात्री 9.30 वाजता रुग्णालयात पोहचल्या. त्यांच्यासोबत फिरहाद हकीम, निर्मल माळी आणि अरुप बिस्वासही होते.
दिवाळीच्या एक आठवड्यापूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. सुब्रत मुखर्जी हे गेल्या रविवारी एसएसकेएम रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखरेचा श्वास घेतला. बंगालच्या राजकारणातील सदाबहार व्यक्तिमत्व सुब्रत मुखर्जी यांनी आज सर्वांचा निरोप घेतलाय.
सुब्रत मुखर्जी हे ममता बॅनर्जी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. सुब्रत मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत विभागाने बंगालमध्ये मोठे स्थान प्राप्त केले. सुब्रत मुखर्जी यांनीही कोलकात्याच्या महापौरपदाची सूत्रे हाती घेतली होती. बंगालच्या नेत्यांमध्ये त्यांची वेगळीच ओळख होती.