Zika Virus : कानपूरमध्ये कोरोनाच्या संसर्गानंतर आता झिका विषाणूचा संसर्ग फैलावत आहे. आज, गुरुवारी आणखी 30 बाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे आता एकूण झिका बाधितांची संख्या 66 झाली आहे.
कानपूर शहराचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नेपाल सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, गुरुवारी कानपूर शहरात 30 जणांना झिका विषाणूची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. कानपूरमध्ये झिका विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या सहा जवानांसह २५ जणांना झिका विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले होते.
उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या कानपूरमध्ये २५ ऑक्टोबर रोजी झिका विषाणूचा पहिला बाधित आढळला होता. हवाई दलाच्या जवानांना झिकाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर झिकाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही संसर्गबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये दिल्लीहून केंद्रीय पथक, लखनऊमधून आरोग्य विभागही काम करत आहे. मात्र, बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.
मुंबईत 330 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, मृतांची संख्या घसरली
गेल्या 24 तासामध्ये राज्यात एकूण 1,163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64,56,263 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.6 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 15 हजार 062 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,86,432 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 878 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,30,47,584 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.