मुंबई : 21 मे रोजी होणारी नीट पीजी परीक्षा 2022 (​NEET PG Exam 2022)  पुढे ढकलण्याची मागणी देशभरातील विद्यार्थ्यांनी केली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. कोविड ड्युटीमुळे यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला पुरेसा वेळ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे परीक्षा किमान दहा आठवडे पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे. यावर आज (13 मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून ही परीक्षा पुढे ढकलणार का? याकडे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.


नीट पीजी परीक्षा 21 मे रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून NEET PG 2021 काऊंसलिंगच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची किंवा स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे नीट पीजी 2021 परीक्षेनंतर प्रवेशासाठीचे काऊंसलिंगचे राऊंड अद्याप अनेक राज्यात पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे काऊंसलिंग राऊंड्स आणि यावर्षी होणारी नीट पीजी परीक्षा यात फार अंतर नाही. शिवाय कोविड ड्युटीमुळे यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे किमान दहा आठवडे परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं याकडे सगळ्याच विद्यार्थांचं लक्ष आहे.


NEET PG 2022 : नीट परीक्षा स्थगित करण्याची आयएमएची मागणी, आरोग्य मंत्र्यांना लिहिलं पत्र


IMA चं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र
याआधी भारतीय वैद्यकीय संघटनेने (IMA)  काल (12 मे) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहून परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की, "राज्यांमधील रिक्त पदांसाठीचे समुपदेशनाची प्रक्रिया मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून पाच ते दहा हजार विद्यार्थांनी इंटर्न म्हणून काम केलं. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी NEET PG परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन NEET PG परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी."


इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे की, NEET PG परीक्षा 2022 ची तारीख आणि NEET PG 2021 साठी समुपदेशन पूर्ण होण्यामधील अंतर इतकं कमी आहे की उमेदवाराने अशा अत्यंत कठीण परीक्षेची तयारी करणं आणि परीक्षाला बसण्यासाठी इच्छुक उमेगवारांसाठी हे खूपच अवघड आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत. म्हणून, यावेळी तुम्हाला हस्तक्षेप करण्याची विनंती करतो आणि NEET PG परीक्षा 2022 योग्य वेळेत  पुढे ढकलण्याचा तातडीने विचार करा, जेणेकरुन, सध्याच्या NEET PG विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि बसण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.