Boycott Starbucks trends on Twitter: 'समलिंगी विवाहा'वर (Same Sex Marriage) सध्या देशात चर्चा सुरू आहे. अशातच कॉफीहाऊस कंपनी स्टारबक्सनं  (Starbucks) याच मुद्द्यावर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पण याच जाहिरातीमुळे स्टारबक्स नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या जाहिरातीच्या निषेधार्थ #BoycottStarbucks हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. स्टारबक्सची जाहिरात भारतात 'समलैंगिक विवाहांना' प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून करण्यात आला आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण आहे तरी काय...? 


10 मे रोजी स्टारबक्सनं '#ItStartsWithYourName' या हॅशटॅगसह सोशल मीडियावर एका जाहिरात शेअर केली होती. यामध्ये स्टारबक्समध्ये एक वृद्ध जोडपं बसलेलं दिसतंय. ते आपला मुलगा अर्पितची वाट पाहत आहेत. पण अर्पितऐवजी अप्रिताची एन्ट्री होते. 


खरं तर अर्पिताच अर्पित आहे. जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या अर्पितनं त्याचं लिंग बदल करून घेतलं आणि तो मुलगी झाल्याचं दाखवलं आहे. स्टारबक्सची ही जाहिरात पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि युजर्स भडकले. त्यांनी कंपनीवर 'समलैंगिक विवाह' आणि 'लिंग बदलाचा' प्रचार केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली.


पाहा स्टाबक्सची जाहिरात 



स्टारबक्सच्या जाहिरातीत काय दाखवलं? 


स्टारबक्स स्टोअरमध्ये बसलेलं वृद्ध जोडपं त्यांचा मुलगा अर्पित येण्याची वाट पाहत आहे. व्हिडीओमध्ये अर्पितचे वडील काहीसे नाराज दिसत आहेत. अर्पितची आई त्यांना शांत राहा आणि रागावू नका असं वारंवार सांगतेय. काही वेळात एक मुलगी तिथे येते. ती मुलगीही काहीशी चिंतेत असल्याचं पाहायला मिळतं. ती मुलगी येऊन त्या वृद्ध जोडप्याजवळ बसते. जाहिरातीत दाखवल्यानुसार, ती मुलगी म्हणजेच, वृद्ध जोडप्याचा मुलगा अर्पित आहे. तो लिंग बदलून मुलगी झाला आहे. 


आपल्या मुलामधील हा बदल पाहून आधी त्याचे वडील त्याला स्वीकारत नाहीत, पण पत्नीचं मन वळवल्यानंतर तेही अर्पितला अर्पिता म्हणून स्विकारतात. या तणावाच्या वातावरणात वडील कॉफीची ऑर्डर देतात. कॉफी तयार झाल्यावर स्टारबक्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा आवाज येतो. 'तीन कोल्ड कॉफी अर्पितासाठी' अशाप्रकारे, अर्पितच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या 'अर्पिता' असण्याला त्याच्या नव्या नावानं कॉफी ऑर्डर करून मान्यता दिल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे.


आता कंपनीच्या या जाहिरातीवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. निवृत्त आयएएस एम नागेश्वर राव यांनी लिहिलं आहे की, स्टारबक्स इंडिया तुम्ही येथे व्यवसाय करण्यासाठी आला आहात की मूर्खपणाला प्रोत्साहन देण्यासाठी?






अभिनव माथूर नावाच्या युजरनं लिहिलं आहे की, भारतात फक्त तुमची कॉफी विका, तुमचं ज्ञान पाजळू नका. तसेच, प्रांजल नावाच्या युजरनं लिहिलं आहे की, स्टारबक्ससाठी अशा जाहिरातीचा व्हिडीओ बनवणाऱ्या एजन्सीला काढून टाकण्याची नितांत गरज आहे.






























बहुतेक युजर्सनी स्टारबक्सला अशा जाहिराती तयार न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, असेही काही युजर्स आहेत ज्यांनी स्टारबक्सच्या जाहिरातीचं समर्थन केलं आहे. एका यूजरनं लिहिलंय की, शेवटी यात चूक काय आहे? तर आणखी एक युजरनं लिहिलं आहे की, क्रिएटिव्ह जाहिरातीचा व्हिडिओ. आणखी एक युजर म्हणाला की, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. पुढचा युजर म्हणाला की, मला यात काही चुकीचं दिसत नाही. जग बदलतंय.