SSC Recruitment Scam Bengal : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी आणि टीएमसी (TMC) नेते पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीला कार्यालयात घेऊन जाणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) गाडीला एका कारनं धडक दिली आहे. ईडीच्या गाडीत अर्पिता मुखर्जीसोबत ईडीचे अधिकारीही गाडीत होते. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेलं नसून सर्वजण सुरक्षितपणे वाचले आहेत. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अर्पिताला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 


अर्पिता मुखर्जीला काल एक दिवसाच्या कोठडीत पाठवण्यात आलं होतं. काल संध्याकाळी उशिरा अर्पिताला कोर्टातून ईडीच्या गाडीमधून कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात जात असताना एका गाडीनं तिच्या कारला धडक दिली. काल संध्याकाळी बँकशाल कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. बँकशाल कोर्टानं अर्पिताचा जामीन अर्ज फेटाळला आणि तिला एक दिवसाच्या कोठडीत पाठवलं. मात्र, ईडीनं अर्पिताच्या 14 दिवसांच्या रिमांडची विनंती न्यायालयाकडं केली आहे. याप्रकरणी शनिवारी अर्पिताला अटक करण्यात आली. ईडीने त्याच्या घरावर छापा टाकून 21 कोटींहून अधिक रोख जप्त केले. 


या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले बंगालचे माजी कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, त्यांना एसएसकेएम हॉस्पिटलमधून एअर अॅम्ब्युलन्सनं एम्स, भुवनेश्वर येथे नेण्यात येत आहे. ते व्हील चेअरवर आहेत. त्यांच्यासोबत रुग्णालयातील डॉक्टर आणि वकील आहेत. भुवनेश्वर एम्समध्ये पार्थ चॅटर्जीसाठी वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात आलं आहे. 


आता पुढे काय होणार?


न्यायालयाच्या निर्देशानुसार, चॅटर्जी यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल तयार करून उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे. एसएसकेएमचे डॉ. पार्थ चॅटर्जी यांच्या वकिलालाही अहवाल द्यावा लागेल. तपास अधिकारी या अहवालाची प्रत कोलकाता येथील ईडी कार्यालयाला पाठवतील. ईडी हा अहवाल कनिष्ठ न्यायालयात सादर करणार असल्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. आज दुपारी 4 वाजता कनिष्ठ न्यायालयात सुनावणी होणार आहे.