Draupadi Murmu Oath Ceremony : देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) आज राष्ट्रपती पद (President) आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देणार. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या मोठ्या फरकानं विजयी झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावा, अशी मागणी केली जात होती. आता द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य झाली आहे.
नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा समारंभानंतर 'गार्ड ऑफ ऑनर'नं सन्मान
संसदेच्या समारंभानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील, जिथे त्यांना इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर प्रदान केलं जाईल. मावळत्या राष्ट्रपतींचा शिष्टाचारानुसार सन्मान केला जाईल.
समारंभासाठी आमंत्रित केलं होतं
शपथविधी सोहळ्यापूर्वी मावळते राष्ट्रपती आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती संसदेत जातील. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रिपरिषदचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारचे प्रमुख, नागरी आणि लष्करी अधिकारी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
असा असेल शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम
- सकाळी 9 वाजून 25 मिनीटांनी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनात पोहोचतील
- राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर नवनियुक्त राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल
- सकाळी 9 वाजून 50 मिनीटांनी द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून संसद भवनाकडे ताफ्यात एकत्र रवाना होतील.
- 10 वाजून 3 मिनीटांनी हा ताफा संसदेच्या गेट क्रमांक 5 येथील संसद भवनात पोहोचेल.
- त्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतरांसह सेंट्रल हॉलकडे रवाना होतील.
- 10 वाजून 10 मिनीटांनी सेंट्रल हॉलमध्ये आगमन आणि राष्ट्रगीत वाजवले जाईल
- 10 वाजून 15 मिनीटांनी शपथविधी सोहळा
- 10 वाजून 20 नवीन राष्ट्रपतींचे भाषण
- 10 वाजून 45 मिनीटांनी नव्या राष्ट्रपती आणि माळते राष्ट्रपती संसदेतून राष्ट्रपती भवनाकडे जातील
- 10 वाजून 50 मिनीटांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभ
- 11 वाजता राष्ट्रपती भवनात मावळत्या राष्ट्रपतींना निरोप दिला जाईल