नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दिवशीच राणे दिल्लीत दाखल झाले. बरोबर 12 वर्षापूर्वी राणेंची अशीच एक दिल्ली भेट गाजली होती. तेव्हा या भेटीचं ठिकाण 10 जनपथ हे होतं. यावेळी बाकी परिस्थिती तशीच होती, फक्त ठिकाण बदलेलं होतं, 11 अकबर रोड अर्थात भाजपाध्यक्ष अमित शाह यांचं निवासस्थान.
दुपारी दोन वाजता राणे विस्ताराच्या फ्लाईटनं दिल्लीत दाखल झाले. अडीचच्या सुमारास त्यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं तेव्हा अतिशय शांत स्वरात त्यांनी "अजून भेटीची वेळ ठरलेली नाही, एकदा ठरली की सांगेन. मीटिंग झाल्यावर बोलेनच मी" असं सांगितलं. योगायोगानं याच दिवशी भाजपनं कार्यकारिणीच्या माध्यमातून दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शनाचा बेत आखलेला होता. राज्याचं मंत्रिमंडळ, देशभरातले 1400 आमदार, साडेतीनशेच्या आसपास खासदार असा सगळा लवाजमा दिल्लीत दाखल झालेला होता. मुख्यमंत्रीही रविवारी रात्री अडीचच्या सुमारास महाराष्ट्र सदनात उतरले होते. काही मंत्री एक दिवस आधीच तळ ठोकून होते. पण या सगळ्यात चर्चेचा फोकस मात्र राणेच होते. खासदार, आमदारही कार्यकारिणीच्या धावपळीत राणेंचं काय होतंय याचा अदमास घ्यायचा प्रयत्न करत होते.
हॉटेलमध्ये उतरलेले राणे साडेपाचच्या सुमारास दानवेंच्या निवासस्थानी पोहोचले. भाजप मुख्यालयाच्या अगदी समोरच 8, अशोका रोड इथे दानवेंचा बंगला आहे. या बंगल्यावर दानवे, चंद्रकांतदादा, राणे हे बैठकीसाठी जमले. थोड्या वेळासाठी मुख्यमंत्रीही या बैठकीत येऊन गेले. मात्र नंतर गडकरींच्या परिवहन खात्याकडे एका बैठकीसाठी ते निघून गेले.
साडेसातच्या सुमारास दानवेंच्या बंगल्याबाहेर हालचाल वाढली. राणे, दानवे, चंद्रकांतदादा असे एकाचवेळी दारातून बाहेर आले. कॅमेरा पाहूनही कुणी अस्वस्थ झालेलं नव्हतं. शहांना कधी भेटताय या प्रश्नावर राणे अगदी कूलपणे भेटल्यावर बोलतो मी असं सांगून गाडीत पुढच्या सीटवर बसले. मागे एका बाजूला दानवे, दुसऱ्या बाजूला चंद्रकांतदादा असे एकाच गाडीत बसून शहांच्या भेटीसाठी रवाना झाले.
संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या आसपास ते अमित शाहांच्या 11 अकबर रोड या निवासस्थानी पोहोचले. शाह त्यावेळी त्यांच्या बंगल्यावर नव्हते. पक्ष मुख्यालयात भाजपच्या मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करत होते. शहांच्या आगमनाची वाट पाहत हे तिघे जवळपास सव्वा तास तिथे बसून होते. रात्री 9 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास अमित शहा आपल्या बंगल्यावर पोहोचले. नंतर ही मीटिंग अगदी 20-25 मिनिटेच चालली. जायच्या आधी अगदी बिनधास्त असलेले राणे मीटिंगनंतर मात्र लपूनछपूनच बाहेर पडले. समोरच्या दोन गेटवर लक्ष्य असतानाही ते बाहेर जाताना दिसले नाहीत, याचा अर्थ ते मागच्या एखाद्या गेटनं बाहेर पडले असावेत.
काँग्रेसप्रमाणेच भाजपचंही ठंडा करके खाओ?
30 तारखेच्या आत आपली भविष्यातली दिशा स्पष्ट करणार असं ठणकावणाऱ्या राणेंची अडचण भाजपच्या थंड प्रतिसादामुळे वाढण्याची शक्यता आहे. काल अमित शाहांच्या बैठकीत राणेंच्या राजकीय अटी-अपेक्षांबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही. राणेंनी काँग्रेस का सोडली, राहुल गांधींची कार्यशैली कशी आहे अशी सुरुवात करुन सध्याच्या राजकीय विषयावरच त्यांनी बोलणं सुरु केलं. अमित भाई पक्के गुजराती आहेत, त्यामुळे वाटाघाटी करताना पहिलं पाऊल आपण टाकायचं नाही हे त्यांनी पक्कं केल्याचं दिसत होतं, असं बैठकीत उपस्थित सूत्रांनी सांगितलं. जी माहिती कळली त्यानुसार राणेंना आपल्या अटी-शर्तीबद्दल बोलण्याची काही संधीच या बैठकीत मिळाली नाही. उलट भाजपची, संघाची शिस्त कशी आहे, या शिस्तीत जे बसत नाहीत त्यांच्यावर आपल्याकडे कशी कारवाई होते याची आठवण करुन एकप्रकारे राणेंना पहिल्याच भेटीत अमित शाहांकडून कडू डोस मिळाला.
राणेंकडून थेट काही प्रस्ताव येत नव्हता आणि आपण पहिला प्रस्ताव द्यायचा नाही असं पक्कं ठरवल्यानं शेवटी अमित शाहांनी लगबगीनं आपल्याला फ्लाईट पकडायची आहे असं सांगत बैठकीचा समारोप केला. इन्सुलिनचं इंजेक्शन मागवून, निघता निघताच काही पटकन खात ते उठले. ठीक है राणेजी, मै 20 घंटे काम करनेवाला आदमी हूं. अगर कुछ है तो आप कभी भी दादा को बोल दीजिए, असं म्हणून त्यांनी मीटिंग संपवली.
राणेंबद्दल भाजप काय विचार करतंय?
पहिल्या दिवशीचा अनुभव पाहिल्यावर राणेंना कदाचित आपल्या नुकत्याच सोडलेल्या पक्षाची कळवळून आठवण आल्याची शक्यता नाकारता येत नाही. राणेंना प्रवेश निश्चितीबद्दलचा कुठलाही शब्द या बैठकीत मिळालेला नाही. भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. राणेंचं अतिशय शिस्तीत राजकीय वजन तोलूनमापूनच निर्णय घेतला जाईल असं दिसतंय. शिवाय ज्या पद्धतीनं राणेंची वाट वारंवार थोपवली जातेय, ती पाहता मुख्यमंत्र्यांची चाल यशस्वी होतेय असं म्हणायला हरकत नाहीय. कारण मुख्यमंत्री राणेंच्या थेट भाजप प्रवेशाला फारसे अनुकूल नसल्याचं भाजपमधलेच काही नेते सांगतात. शिवसेनेला उत्तर म्हणून जरी राणेंना वापरायचं ठरवलं तरी त्यांना थेट पक्षात घेण्याऐवजी त्यांनी एखादी संघटना काढून तिला ताकद द्यायचा पर्याय भाजपसमोर आहे. शिवाय राणेंचा, त्यांच्या पुत्रांचा आजवरचा इतिहास पाहता ही सगळी बाकी आपल्या खात्यावर जमा करण्याची रिस्क भाजप, संघ कसा घेईल याची उत्सुकता आहे. मोदी-शहांच्या काळात अनेक पक्षप्रवेश असे झालेत की सकाळी एखाद्यानं पक्ष सोडल्यावर त्याला संध्याकाळी भाजपची माळ घातली गेलीय. राणेंनी जाहीरपणे काँग्रेसवर टीका करुन पक्ष सोडला तरी अजून त्यांना मात्र शब्द दिलेला नाहीय हे विशेष.
बैठकीत असं ठोस काही झालं असतं तर ही भेट राणेंच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन निमंत्रणासाठी होती वगैरे फोकनाड कारणं सांगितली गेली नसती. बैठकीतून बाहेर पडल्यावर काय सांगायचं आहे याची व्यवस्थित शाळा घेतल्यानं बहुधा सगळे एकाच सुरात बोलत होते. तर एक नक्की की भाजप अजून वेळ घ्यायला तयार आहे. महाराष्ट्रातल्या कॅबिनेटचा विस्तार दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पुन्हा राणेंच्या बद्दलची चर्चा सुरु होईल असं सध्या तरी कळतंय. त्यामुळे राणेंसाठी हा पुढचा काळ जास्त तगमगीचा, अस्वस्थता वाढवणारा असेल हे नक्की.
त्या परत गेलेल्या जेवणाचं गूढ काय?
अमित शाहांच्या निवासस्थानी राणे, दानवे, चंद्रकांतदादा हे साडेसात वाजल्यापासून बसून होते. दीड तास झाला तरी अजून शाह बंगल्यावर यायची चिन्हं दिसत नव्हती. बाहेर तीन चार पत्रकारही बराच काळ वाट पाहत ताटकळत होते. नऊच्या सुमारास अखेर शहा बंगल्यात शिरले. त्यानंतर पाचच मिनिटांत महाराष्ट्र सदनाच्या प्रोटोकॉलची एक गाडी बंगल्याबाहेर येऊन थांबली. या मीटिंगमध्ये आता आणखी कुणी एन्ट्री मारतंय का अशी शंका उपस्थित झाली. त्यामुळे जवळ जाऊन विचारपूस केली, तर उत्तर आलं की "अंदर से खाना मंगवाया था, लेकिन अब लगता है वापस जाना पडेगा." पाचच मिनिटांत ही गाडी पुन्हा निघून गेली.
राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2017 03:52 PM (IST)
अमित भाई पक्के गुजराती आहेत, त्यामुळे वाटाघाटी करताना पहिलं पाऊल आपण टाकायचं नाही हे त्यांनी पक्कं केल्याचं दिसत होतं, असं बैठकीत उपस्थित सूत्रांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -