हनीप्रीत दिल्लीतच लपल्याची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2017 01:43 PM (IST)
मीडियामध्ये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यावाचून माझ्याजवळ कोणताही पर्याय नाही, असं हनीप्रीत म्हणाली.
नवी दिल्ली : बाबा राम रहीमची निकटवर्तीय मानली जाणारी हनीप्रीत दिल्लीतच असल्याची माहिती समोर आली आहे. आज हनीप्रीतच्या वतीनं तिच्या वकिलांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. दुपारी दोन वाजता या अर्जावर सुनावणी होणार आहे. हनीप्रीतच्या जामिन अर्जात काय? 'माझ्या जीवाला धोका आहे. मी बालपणापासूनच डेऱ्याशी जोडली गेले आहे. राम रहीमची मुलगी असणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हरियाणा पोलिसांनी माझं नाव वॉण्टेड लिस्टमध्ये टाकलं आहे.' असं हनीप्रीतने तिच्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटलं आहे. मीडियामध्ये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यावाचून माझ्याजवळ कोणताही पर्याय नाही. माझ्याविरोधात कोणतीही केस नाही. जबरदस्ती मला गुन्ह्यात गोवलं जात आहे, असा दावाही तिने केला. 'मी एकटी आहे आणि मला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मला तपासात सहभागी व्हायचं आहे. मी कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाणार नाही. मला तीन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी कोर्टाकडे विनंती करते.' असं हनीप्रीतने अर्जात म्हटलं आहे. हनीप्रीत ही बेपत्ता झालीच नव्हती, सोमवारी ती स्वतः आपल्याला ऑफिसमध्ये भेटायला आल्याचा दावा हनीप्रीतच्या वकिलांनी केला. पोलिसांनी मात्र हनीप्रीत दिल्लीत असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.