मुंबई : कुलभूषण जाधव... मराठमोळा माजी नौदल अधिकारी.. कुलभूषण सध्या पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत... त्यांच्या सुटकेसाठी अवघा देश प्रार्थना करत आहे. त्यांचे आई वडिल मंदिरं पालथी घालत आहेत. कुलभूषण यांना हेर ठरवून पाक त्यांना फासावर चढवण्यासाठी उतावीळ झाला आहे. एबीपी न्यूजनं पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला आहे. तोसुद्धा थेट लंडन आणि बलुचिस्तानमधून..
कुलभूषणनं हेरगिरी केली - पाकिस्तान
कुलभूषण रॉचा एजंट - पाकिस्तान
कुलभूषणला पाकमध्ये पकडलं - पाकिस्तान
अशा खोटारड्या कहाण्या रचून कुलभूषणला फासावर चढवण्यासाठी पाकडे उतावीळ झाले आहेत. पण एबीपी न्यूजनं पाकच्या सगळ्या दाव्यांची पोलखोल केली आहे. केवळ भारताचा बदला घेण्यासाठी पाकनं कुलभूषणला बळीचा बकरा बनवलं आहे.
एबीपी न्यूजच्या एका रिपोर्टमुळे पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश झाला आहे आणि पाकिस्तानला याची जाणीव असल्यामुळेच भारतीय राजदूतांना, वकिलांना कुलभूषणला भेटण्याची परवानगी मिळत नाही.
एक-दोन नाही तर तब्बल 13 वेळा पाकनं भारताला काऊन्सिलर अॅक्सेस नाकारला आहे. इतकंच नाही तर कुलभूषण यांच्या आई अवंतिका यांनाही कुलभूषण यांना भेटण्यास पाकनं परवानगी दिली नाही आणि पाकचा कच्चाचिठ्ठा माहिती असल्यानेच कुलभूषण यांना काळकोठडीत बंद करण्यात आलं आहे.
मेहराब सरवाज... मिडल ईस्टमधल्या राजकारणावर त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म सरावनमध्ये झाला आहे. पण आजकाल ते लंडनमध्ये वास्तव्याला असतात. पण असं असलं तरी बलुचिस्तान त्यांच्या नसानसात आहे, तिथल्या घडामोडींवर त्यांची बारीक नजर आहे.
मेहराबच पाकिस्तानने कुलभूषण यांना अडकवण्यासाठी त्यांनी रचलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश करणार आहेत. मेहराब यांच्या दाव्यानुसार कुलभूषण यांना व्यवस्थित प्लॅनिंग करुन फसवण्यात आलं.
जाधव यांचं अपहरण करण्याचा ठेका लष्कर ए खुरासनला मिळाला. केवळ खंडणीसाठी परदेशी नागरिकांचं अपहरण करण्यात खुरासनचा हातखंडा आहे. जाधव यांची चूक फक्त एका ठिकाणी झाली, ते व्यवसायाच्या लालसेनं अपहरणाच्या जाळ्यात अलगद अडकत गेले.
कुलभूषण यांना इराणमध्ये पकडण्यात आलं. आणि लष्कर ए खुरासन संघटनेनं कुलभूषण यांना पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला विकलं आणि हे सगळं व्हायला तब्बल 3 आठवड्यांचा वेळ लागला. कुलभूषण यांनी भारतीय नौदलात काम केलं होतं. नौदलाची नोकरी सोडल्यानंतर 2003 मध्ये जाधव इराणला गेले.
तिथं कमिंगा ट्रेडिंग कंपनीच्या नावावर स्क्रॅपचा व्यवसाय सुरु केला. इराणमध्ये कुलभूषण यांचा व्यवसाय लोकांच्या डोळ्यावर येऊ लागला. त्यातच ते ज्या परिसरात होते, तो छबार परिसर परदेशी नागरिकांचं अपहरण, खंडणीसाठी बदनाम आहे.
पण या सगळ्या संकटातही जाधव व्यवसाय वाढवण्यासाठी झटत होते. आणि जाधव काळ्या धंद्यात अडकलेल्या लोकांच्या संपर्कात आले. आणि याच काळात बलुचि नागरिकाच्या व्यवसायाचं आकर्षक प्रपोजल जाधवांसमोर आलं.
मग त्यासाठी जाधव पाकच्या सीमेवर असलेल्या सरावनला गेले. यावेळी त्यांच्यासोबत बलुचि स्वातंत्र्यासाठी काम करणारा कार्यकर्ताही होता. जवळपास एक-दीड तासाच्या प्रवासानंतर जाधव थेट पाकिस्तानात सापडले.
आता ही झाली पाकनं कुलभूषण यांना हेर ठवण्यासाठी मनात येईल तशी रचलेली गोष्ट.. पण त्यापुढे जाऊन जेव्हा पाकिस्तानमधील लष्करप्रमुख, मंत्री बोलू लागले, तेव्हा त्यांची परस्परविरोधी वक्तव्य कुलभूषण यांचं अपहरण कसं झालंय, त्यांना कसं फसवण्यात आलं, हे सिद्ध करणारी ठरलीत.
ज्या कारनं कुलभूषण जाधव सरावनला गेले, त्या कारमधील लोक जाधव यांच्या ओळखीचे होते, हे लगेच लक्षात येतं..
त्यामुळे आता प्रश्न असा आहे की तो बलूच स्वातंत्र्यासाठी काम करणारा कार्यकर्ता होता कोण? आणि तो जाधवांना कुठं घेऊन गेला?
पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि कुलभूषण यांची स्टोरी इथून सुरु होते.
सूत्रांच्या माहितीनुसार बलुची आदिवासी कुबदानी आणि जरदारी जाधव यांना लष्कर ए खुरासन संघटनेकडे घेऊन जात होते.
खुरासन संघटनेचं काम तुरबत जवळच्या जामरानच्या डोंगररांगातून चालतं आणि इथंच तब्बल तीन आठवडे कुलभूषण यांना बंदी करुन ठेवलं. त्यानंतर खुरासनचा नेता मुल्ला उमरनं कुलभूषण यांना आयएसआयच्या ताब्यात दिलं.
कुलभूषण जाधव यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांवरुन ते पाकिस्तानच्या जास्त उपयोगाला येऊ शकतात,
आणि कुलभूषणमुळे पाकिस्तान भारत आणि इरान दोघांचीही कोंडी करु शकतं, याची जाणीव खुरासनच्या अतिरेक्यांना झाली
26 मार्चला पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी जाधव यांच्या हवाल्यानं इराणला धमकी दिली होती. ज्यात कुलभूषण सारख्या लोकांच्या मदतीनं इराण चाबहार प्रांतातून पाकमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप केला.
त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे 29 मार्चला पाकचे माहिती आणि प्रसारण मंत्री जनरल असीम सलीम बाजवांनी पत्रकार परिषदेत जाधवांच्या अटकेची माहिती जगाला दिली.
कुलभूषण यांनी दिलेल्या जबाबात आणि पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या वक्तव्यात जमीन-अस्मानचं अंतर आहे. त्यामुळेच पाकच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश होतो.
जिथं कुलभूषण गेले होते. आणि जिथं त्यांना अटक केल्याचं सांगण्यात येतंय ती दोन्ही स्थळ विरुद्ध दिशेला आहेत आणि यात तब्बल 2 हजार किलोमीटरचं अंतर आहे.
इराणच्या चाबहारपासून सरावन 454 किलोमीटरवर आहे. जिथं भाड्याच्या कारनं जाधव पोहोचले होते आणि सरावन ते मशकेल हे अंतर तब्बल 1652 किलोमीटर आहे, जिथं जाधव यांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे.
पाकचे मंत्री आणि लष्करप्रमुखांनी केलेल्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळेच पाकचा खोटारडेपणा जगासमोर आला आणि खोटारडेपणा लपवण्याच्या नादात इराणची दहशतवादी संघटना आणि आयएसआयचं असलेलं गूळपीठही जगासमोर आलं.
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2017 09:03 PM (IST)
कुलभूषण जाधव... मराठमोळा माजी नौदल अधिकारी.. कुलभूषण सध्या पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत... त्यांच्या सुटकेसाठी अवघा देश प्रार्थना करत आहे. त्यांचे आई वडिल मंदिरं पालथी घालत आहेत. कुलभूषण यांना हेर ठरवून पाक त्यांना फासावर चढवण्यासाठी उतावीळ झाला आहे. एबीपी न्यूजनं पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला आहे. तोसुद्धा थेट लंडन आणि बलुचिस्तानमधून..
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -