नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गोव्यात बीफचा तुटवडा जाणवू देणार नाही असं वक्तव्य मनोहर पर्रिकर यांनी केल्यानंतर, विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे.

राज्यात बीफचा तुटवडा भासू नये म्हणून कर्नाटक आणि अन्य भागांतून बीफ आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. बीफचा तुटवडा भासू दिला जाणार नाही, असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी विधानसभेत दिलं होतं.

पर्रिकर यांच्या या विधानावर वाद सुरु झाला. या वक्तव्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होत आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे.

एकीकडे गोमांस बंदीचा वाद देशभरात चिघळलेला असताना मनोहर पर्रिकर यांनी गोव्यातील जनतेला हमी दिल्याने भाजपची मोठी गोची झाली आहे.

गोव्यात तयार होतं 2 हजार किलो बीफ
सभागृहात भाजप आमदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना मनोहर पर्रिकर म्हणाले की, गोव्यातील एकमेव कत्तलखान्यात सुमारे 2000 किलो बीफ तयार होतं. बीफचा तुटवडा होऊ नये यासाठी शेजारच्या राज्यांमधून जनवरांची खरेदी सुरु राहिल. बाहेरुन येणाऱ्या बीफची योग्य तपासणीही होईल.