काबुल : काबुलमध्ये तालिबान्यांचा कब्जा आणि अनागोंदी दरम्यान भारताच्या दूतावासाचे कर्मचारी आणि आयटीबीपी जवानांना बाहेर काढणे कठीण ऑपरेशनपेक्षा कमी नव्हते. भारतात परतण्याच्या आशेने, भारतीय राजदूतांसह वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि भारतीय जवानांनी संपूर्ण रात्र जागून काढली.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान्यांच्या नाकाबंदीच्या दरम्यान आधी भारतीयांना सुरक्षितपणे एकत्र करण्यात आले. त्यानंतर विमानतळावर सुरक्षितपणे पोहोचणे मोठ्या धाडसाचं काम होतं. सोमवारी संध्याकाळी काबुलमध्ये दाखल झालेले भारतीय हवाई दलाचे C-17 विमान रात्री उशिरा निघणार होते, पण तालिबान्यांचा पहारा आणि शहरात सुरू असलेल्या अराजकतेदरम्यान इव्हॅक्यूशन मिशन थांबवावे लागले. यामुळे हवाई दलाची विमाने आणि वैमानिकांनीही तणावपूर्ण स्थितीत काबुल विमानतळावर रात्र काढली.


Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात 83 अब्ज अमेरिकी डॉलर खर्चाचा तालिबानला मिळाला फायदा, कसा ते वाचा


दरम्यान, काबुल विमानतळावर नियंत्रण ठेवणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यापासून ते अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकेन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या चर्चेपर्यंत, भारतीय परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी बातचित सुरु होती. यासह तालिबान गटांशी संपर्क साधून हे देखील सुनिश्चित केले गेले की भारतीयांना कोणत्याही हानीशिवाय विमानतळावर पोहोचणे शक्य होईल. या दरम्यान सर्वात कठीण काम होते तिथे अडकलेल्या भारतीयांना वेगवेगळ्या ठिकाणाहून बाहेर काढणे आणि त्यांना एका ठिकाणी आणणे. हे अत्यंत काळजीपूर्वक केले गेले.


US Plane Inside Pics: जीव वाचवण्यासाठी अमेरिकेच्या विमानात शिरले तब्बल 800 जण


मात्र, अवघ्या 20 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. यावरून अडचणींचा अंदाज लावला जाऊ शकतो. तालिबान्यांच्या नाकाबंदीने त्यांची वाहने मध्येच अनेक वेळा थांबवली गेली. या दरम्यान, सर्वात मोठे आव्हान आणि धोका होता की कोणतीही घटना संपूर्ण ऑपरेशनसाठी धोका बनू शकते. अशा परिस्थितीत मिशनमधील लोकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी मिशनच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आयटीबीपीच्या जवानांवर होती.


ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच वाहनांचा ताफा निघाला कठीण प्रवासानंतर विमानतळावर पोहोचला. जेथे काही लोक आधीच उपस्थित होते. विमानतळावरील भयावह वातावरणा दरम्यान आपल्या लोकांना सुरक्षित ठेवणे हे देखील एका आव्हानापेक्षा कमी नव्हते. 


सकाळी 7 वाजताच्या सुमारास प्रत्येकजण विमानात चढले, तेव्हा दिल्लीतील या ऑपरेशन कार्यात समन्वय साधणाऱ्या लोकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. साडेसातच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या विमानाने उड्डाण केले. मात्र, भारतीय विमान अफगाण हवाई क्षेत्रातून बाहेर येईपर्यंत चिंता कायम होती.