रांची : बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांवर आज रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात निर्णय सुनावला जाणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्याशी हा घाटोळा संबंधित असल्याने रांची कोर्टाच्या निर्णयाकडे बिहारसह अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
मुलासोबत लालू रांचीत दाखल
लालूप्रसाद यादव हे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह रांचीत पोहोचले आहेत. चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास भोगावा लागतोय की जामीन मिळतोय, हे आज ठरणार आहे.
पंतप्रधानांवर लालूंचा निशाणा
कोर्टाचा निर्णय ऐकण्यासाठी रांचीला जाण्याआधी लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सीबीआय मला तुरुंगात पाठवू पाहत आहेत. मला तुरुंगात जायला भीती वाटत नाही. माझा न्यायावर विश्वास आहे आणि न्याय मिळेल.”
आज कोणत्या प्रकरणात निर्णय येणार?
देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात आज निर्णय सुनावला जाणार आहे. लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आज अंतिम निकालाची अपेक्षा आहे.
चारा घोटाळा नेमका काय आहे?
1996 साली चारा घोटाळा उघड झाला होता. त्यावेळी हा घोटाळा 950 कोटी रुपयांचा होता. आजचा निर्णय देवघर तिजोरीमधून काढलेल्या रकमेशी संबंधित आहे. लालूंनी 90 लाख रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे.
चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत. यातील एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते काही काळ निवडणुकीच्या राजकारणातून दूर झाले. त्या खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झाली असली, तरी ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.
चारा घोटाळ्याशी संबंधित सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी याचिका लालूप्रसाद यादव यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली आणि प्रत्येक खटला स्वतंत्रपणे चालवण्याचे आदेश दिले.
चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री
चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत. सरयू राय यांना कधीकाळी वाटलंही नव्हतं की, चारा घोटाळा इतकं मोठं रुप घेईल आणि त्यात लालूप्रसाद यादवांना तुरुंगवासाची शिक्षा होईल.
1990 मध्ये चारा घोटाळ्याला सुरुवात
चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात झाली होती. त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता.
या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर आहेत.