31 ऑक्टोबर 1984 रोजी नवी दिल्लीतील 1, सफदरजंग रोड, इथल्या निवासस्थानी अंगरक्षकांनीच इंदिरा गांधी यांची हत्या केली होती. 1966 पासून 1977 दरम्यान सलग तीन वेळा त्यांनी देशाची धुरा सांभाळली. यानंतर 1980 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट केलं आहे. "आज माझी आजी इंदिरा गांधी यांचा बलिदान दिवस आहे. तुमचे पोलादी निश्चिय आणि निर्भीड निर्णयांची शिकवण प्रत्येक पावलावर माझं मार्गदर्शन करत राहिल. तुम्हा शत् शत् नमन," असं राहुल गांधी यांनी लिहिलं आहे.
सक्रिय राजकारणात उशिरा
इंदिरा गांधी यांचं सक्रिय राजकारणात उशिरा पदार्पण झालं. वडील जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी राजकारणात आल्या. त्यांनी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात इंदिरा गांधींनी पहिल्यांदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. यानंतर शास्त्रीजी यांच्या निधनानंतर देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली. इंदिरा गांधी 1971 भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
पहिल्या एकमेव महिला पंतप्रधान
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची कन्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला होता. त्या भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहे. इंदिरा गांधी यांनी जानेवारी 1966 पासून मार्च 1977 पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. यानंतर 14 जानेवारी 1980 पासून 31 ऑक्टोबर 1984 या हत्येच्या दिवसापर्यंत त्या पंतप्रधान होत्या.
अंगरक्षकांकडूनच हत्या
31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांच्या बेअंत सिंह आणि सतवंत सिंह या दोन अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर दिल्लीसह अनेक भागात हिंसाचार उफाळला होता. सुवर्ण मंदिरात केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारमुळे बेअंत सिंह आणि सतवंत सिंह नाराज होते, त्यामुळेच त्यांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली.