नवी दिल्ली: सर्व राजकीय पक्षांचे मत विचारात घेऊन, सर्वांच्या सहमतीने कोरोना विरोधात रणनिती तयार केली पाहिजे. देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्र सरकार जे काही करेल त्या प्रत्येक निर्णयाला काँग्रेसची साथ असेल असं काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलंय. सोनिया गांधींनी एका व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून हे मत व्यक्त केलं आहे. 


सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे की, "सध्याची परिस्थिती ही मानवतेला धक्का देणारी आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा तर कुठे औषधांची कमी आहे. अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध नाहीत. ही आपली परीक्षा बघणारी वेळ आहे. या काळात एकमेकांची साथ दिली पाहिजे. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा."  


आताची घडी ही सरकारने आपले कर्तव्य निभावण्याची आहे असं सांगत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या की, "केंद्र सरकारने गरीबांच्या आर्थिक अडचणींचा विचार करावा आणि कोरोनाचे संकट संपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये हस्तांतर करावे. तसेच कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्या. ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णालये यांचे युद्ध स्तरावर नियोजन करावं. देशात सर्वांचं मोफत लसीकरण करावं. जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार थांबवावा." 


लस उत्पादक कंपन्यांच्या नफेखोरीला आळा घाला
चार दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी आरोप केला होता की लस उत्पादक कंपन्यांच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारचं धोरण भेदभावजनक आणि असंवेदवशील आहे. तसेच ही लढाई 'तुम्ही विरुद्ध आम्ही' अशी नाही तर कोरोना विरोधातली आहे असं सांगत त्यांनी कोरोना काळात राजकीय मतैक्य गरजेचं असल्याचं मत मांडलं होतं.


संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा घाट आताच का घालण्यात आला आहे असा सवालही सोनिया गांधींनी केंद्र सरकारला विचारला होता. त्यावर सध्या जो खर्च केला जात आहे तो कोरोनाच्या उपाय योजनेवर करावा असं मत त्यांनी मांडलं होतं. ज्या-ज्या राज्यांत भाजपची सत्ता नाही त्या राज्यांत कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे, ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित केला जात नाही. हे केंद्र सरकारचे धोरण भेदभावजनक असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला होता. 


महत्वाच्या बातम्या :