मी कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही. हवं तर प्रशासनाची इच्छा असेल तर मी एकटी त्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या गावी जायला तयार आहे. कुठल्याही स्थितीत मी त्या आदिवासींना भेटल्याशिवाय जाणार नाही, असे प्रियांका यांनी म्हटले आहे. मी कायदेशीर मार्गाने त्यांना भेटणार आहे मात्र तरीही उत्तर प्रदेश सरकारने हा तमाशा केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
काहीही असो, लोक सगळं पाहात आहेत. मला काहीही असो पीडितांना भेटायचं आहे. जर पीडितांना भेटणे हा गुन्हा असेल तर आणि सरकार मला जर जेलमध्ये टाकत असेल तर मी तयार आहे, असे प्रियांका यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
काल राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर निशाणा साधला होता. "उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये प्रियांका गांधी यांना बेकायदेशीररित्या अटक करणं चिंतीत करणारं आहे. सोनभद्र हत्याकांडातील पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून प्रियांका यांना रोखणं सत्तेचा दुरुपयोग आहे. यावरुन हे सिद्ध होतं की भाजप सरकारमध्ये उत्तर प्रेदशात असुरक्षिता निर्माण झाली आहे, असे राहुल यांनी म्हटलं होतं.
सोनभद्र हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी जात होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याने त्यांनी नारायणपूरमध्येच धरणं आंदोलन केलं. "आम्हाला फक्त पीडितांच्या कुटुंबीयांना भेटायचं आहे. शिवाय माझ्यासोबत फक्त चार लोक असतील, असंही मी सांगितलं होतं. तरीही प्रशासनाने आम्हाला तिथे जाऊ दिलं नाही. आम्हाला का रोखलं याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. आम्ही इथे शांततेत बसून राहू." तर जिल्ह्यातल 144 कलम लावल्याने प्रियांका गांधींना रोखल्याचं प्रशासनाने सांगितलं होतं. यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधींना चुनार गेस्ट हाऊसवर नेण्यात आलं.
काय आहे प्रकरण?
वाराणसीपासून 91 किलोमीटर अंतरावर घोरावल गाव आहे. या गावात एका माजी आयएएस अधिकाऱ्याने 90 एकर जमीन विकत घेतली होती. काही दिवसांपूर्वी ही जमीन गावचा सरपंच यज्ञदत्त भूरियाने विकत घेतली होती. बुधवारी (17 जुलै) दोन दिवसांपूर्वी जमिनीचा ताबा घेण्यासाठी यज्ञदत्त भूरिया 10 ते 12 ट्रॅक्टर आणि हत्यारबंद गुंडांसह पोहोचला. यावेळी गोंड आदिवासी जमातीच्या लोकांनी जमीन ताब्यात देण्यास विरोध केला. यानंतर यज्ञदत्तच्या गुंडांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 10 जणांचे प्राण गेले, तर 19 जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर यज्ञदत्तच्या 29 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. यात त्याच्या दोन पुतण्यांचाही समावेश आहे. मात्र अजूनही मुख्य आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी मध्य प्रदेश आणि इतर राज्यातही पथकं रवाना झाली आहे. पोलिसांनी बॅरल गन आणि रायफलसह इतर हत्यारं जप्त केली आहेत.