बंगळुरु : कर्नाटकातील राजकीय नाट्य अद्यापही सुरुच आहे. कर्नाटकातील राजकीय परिस्थितीबाबत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर सोमवारपर्यंत कर्नाटक विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.





कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल करत राज्यपाल वजूभाई वाला यांच्या आदेशाला आव्हान दिलं आहे. कुमारस्वामी यांनी राज्यपालांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या डेडलाईलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच राज्यपाल विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या कामकाजबाबत आदेश देऊ शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.


गुरुवारी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची दुसरी डेडलाईन दिली होती.





राज्यपालांच्या आदेशानंतरही कुमारस्वामी यांनी आज बहुमत सिद्ध केलं नाही. त्यामुळे सोमवारी विश्वासदर्शक प्रस्तावावर उत्तर देणार असल्याचं कुमारस्वामी यांनी सांगितलं.


राज्यपाल वजुभाई वाला यांनी गुरुवारी कर्नाटक विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून गुरुवारीच बहुमत सिद्ध करण्यासाठी मतदान घ्यावं असंही म्हटलं होतं. मात्र राज्यपालांना सल्ला दुर्लक्ष करत शुक्रवारपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आलं होतं.



संबंधित बातम्या