गोवा : काँग्रेसच्या 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शपथ घेतलेल्या चार नव्या मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले. नवे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना पूर्वीचे उपमुख्यमंत्री असलेल्या विजय सरदेसाई यांच्याकडील खाती सोपवण्यात आली आहेत.

उपमुख्यमंत्री बनलेल्या बाबू कवळेकर यांच्याकडे नगर नियोजन,कृषी, पुराभिलेख, पूरातत्व आणि कारखाने आणि बाष्पक खाते सोपवण्यात आली आहेत. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे माजी अपक्ष मंत्री रोहन खवंटे यांच्याकडील महसूल,आयटी आणि कामगार आणि रोजगार ही खाती सोपवण्यात आली आहेत.

फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांच्याकडे गोवा फॉरवर्डचे माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्याकडे असलेली जलस्त्रोत,मच्छीमार आणि लीगल मेट्रोलॉजी ही खाती सोपवण्यात आली आहेत.
उपसभापती पदाचा राजीनामा देऊन मंत्री बनलेल्या कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्याकडे ग्रामीण विकास, कचरा व्यवस्थापन, बंदर, विज्ञान आणि तंत्रज्ञान ही खाती सोपवण्यात आली आहेत.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडील कायदा खाते काढून घेऊन त्यांना कौशल्य विकास हे नवे खाते देण्यात आले आहे. राणे यांची आरोग्य, उद्योग, महिला आणि बाल कल्याण ही खाती कायम ठेवण्यात आली आहेत.

वाहतूक मंत्री माविन गुदींन्हो यांच्याकडे गृह निर्माण खात्याचा अतिरिक्त भार सोपवताना पशु पालन हे खाते काढून घेण्यात आले आहे. वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्याकडील विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते काढून घेऊन ते नव्याने मंत्री झालेल्या मायकल लोबो यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. काब्राल यांची बाकी खाती कायम असून कायदा खाते पुन्हा त्यांना सोपवण्यात आले आहे. यापूर्वी हे खाते काब्राल यांच्याकडून काढून घेऊन विश्वजीत राणे यांना देण्यात आले होते.