Jammu Kashmir Snowfall : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) बर्फवृष्टी (Snowfall) होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हिमवर्षावामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. बर्फवृष्टीमुळे रस्ते तसेच हवाई वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाकडून हिमस्खलनाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात सोमवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खराब हवामानामुळे राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द


सततच्या बर्फवृष्टीमुळे येथील दृश्यमानता 500 मीटरपेक्षा कमी झाली आहे. यामुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व 68 नियोजित उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खराब हवामानामुळे बारामुल्ला-बनिहाल रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवाही बंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर शहरात सोमवारी जोरदार हिमवृष्टी झाली आहे. गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि इतर उंच भागात बर्फाची जाड चादर पसरली आहे.


जम्मू आणि काश्मीरमध्ये या मोसमातील पहिल्याच मोठ्या हिमवृष्टीने सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. घरांवर, रस्त्यावर चहुकडे बर्फच बर्फ दिसत आहे. साचलेल्या बर्फामुळे अनेक रस्त्यांवरी वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून रस्त्यावर साचलेला बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.


तापमानात कमालीची घट


बर्फवृष्टीमुळे सोमवारी श्रीनगरमधील किमान तापमान उणे 0.2, पहलगामचे उणे 1.4 आणि गुलमर्गचे उणे 4.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर लडाख, कारगिलमध्ये किमान तापमान उणे 6.8 आणि लेहमध्ये उणे 0.6 अंश सेल्सिअस होते. जम्मूमध्ये 10.4, कटरा येथे 9, बटोटेमध्ये 1.2, बनिहालमध्ये 0.2 आणि भदरवाहमध्ये उणे 0.6 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये 1 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात 2-3 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाकडून हिमस्खलनाचा इशारा जारी


काही भागांत हिमस्खलन होण्याची इशारा हवामान विभागाने दिला आहे. डोडा, किश्तवार आणि पूंछ जिल्ह्यात पुढील 24 तासांत समुद्रसपाटीपासून 2,500 मीटर उंचीवर हिमस्खलन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, येत्या 24 तासांत बांदीपोरा, बारामुल्ला, गंदरबल, कुपवाडा, कुलगाम आणि रामबन जिल्ह्यांमध्ये 1,500 ते 2,500 मीटरच्या वर हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात राहणाऱ्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टी.. जम्मू आणि काश्मीरला जोडणारे महामार्ग ठप्प, जनजीवन प्रभावित