Bharat Jodo Yatra : कन्याकुमारीतून सुरु झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा वादळी बर्फवृष्टी दरम्यान सोमवारी  (Bharat Jodo Yatra) समारोप झाला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बर्फवृष्टी होत असताना कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 135 दिवस, 14 राज्य आणि 75 जिल्ह्यातून तब्बल तीन हजार 570 किलोमीटरची पदयात्रा आज संपली... 


सात सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीतून सुरु झालेली भारत जोडो यात्रा 135 दिवसानंतर 30 जानेवारी 2023 रोजी थांबली आहे. कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंतची पदयात्रा आज संपली. कन्याकुमारीतून सुरु झालेल्या भारत जोडोयात्रेच्या प्रवासात राहुल गांधी गोरगरीब लोक, व्यापारी, शेतकरी, मजूर, तरुण मुलं, नोकरदार, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स अशा प्रत्येक वर्गातील लोकांना भेटले. कलाकारांनीही यात्रेत हजेरी लावली होती. राहुल गांधींनी त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. प्रत्येक दिवशी राहुल गांधींनी एक सभा घेतली..तर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदही घेतली..कन्याकुमारी, तिरुअनंतपूरम, कोची, निलंबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव-जामोद, इंदोर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर दिल्ली, अंबाला, पठाणकोट आणि जम्मू अशा ठिकाणी मुक्काम करत यात्रेचा शेवट शेर ए काश्मीर स्टेडियमवर झाला. आणि यावेळी राहुल गांधी भावनिकही झाले..


सप्टेंबरमध्ये भारत जोडो यात्रा सुरु झाली. जशी पुढे गेली तशी राहुल गांधींची दाढीही वाढली. व्हाईट शर्ट आणि क्रीम कलरची ट्राऊझर हा पेहरावही बदलला नाही. पण बदललं ते त्यांचं भाषण.. आधी तावातावानं बोलणारे राहुल आता शांतपणे म्हणणं मांडताना दिसले...ठामपणे मुद्दे रेटताना दिसले.. त्यांनी प्रत्येक सभेतून महागाई, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न यावर बोट ठेवलं. आणि महत्त्वाचं म्हणजे नव्या तरुणांना काँग्रेसकडे येण्यासाठी मार्ग दाखवतानाच जुनेजाणते एकजूट राहावेत म्हणून प्रयत्न केला. मग, याच यात्रेतून राहुल गांधींनी काय मिळवलं? राहुल यांच्या यात्रेत अगदी गोरगरीब माणसापासून ते रघुराम राजन यांच्यासारखे अर्थतज्ज्ञही पायी चालले. बॉलिवूडचे अक्टर्स, सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटीतले लोक राहुल यांच्या यात्रेत चालले.


काँग्रेसला भारत जोडो यात्रेतून काय मिळाल?  


भारत जोडो यात्रामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली. लोकांमध्ये जाणारा नेता अशी त्यांची ओळख झाली. काँग्रेस पक्षासह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचं दिसलं. काँग्रेसला हिमाचल प्रदेशात सत्ता मिळाली. असं असलं तरी देश जोडताना राहुल गांधींसमोर काँग्रेसच्या नेत्यांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचंही आव्हान आहे. यात्रा सुरु असतानाच हिमाचलमध्ये विजयी झालेल्या काँग्रेसनं गुजरातमध्ये सपाटून मार खाल्लाय.म्हणून यात्रेनं काँग्रेस पक्षाला काय मिळेल..यावर मोठी चर्चा झाली. भाजपनंही वेळोवेळी यात्रेवर टीका केली. आणि आज याच यात्रेचा समारोप झालाय. आता त्यातून निर्माण झालेलं नवचैतन्य टिकवण्याचं आव्हान राहुलसमोर असणार आहे.