काश्मीर खोऱ्यात हिमवृष्टी.. जम्मू आणि काश्मीरला जोडणारे महामार्ग ठप्प, जनजीवन प्रभावित
Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये या मोसमातील पहिल्याच हिमवर्षावाने सर्वसामान्य जनजीवन प्रभावित झालंय. राज्यातील महत्वाचे महामार्ग रस्त्यावर साचलेल्या बर्फाने बंद पडलेत. यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने रस्त्यावर साचलेलं बर्फ हटवण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरु केलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्तोरस्ती उभ्या असलेल्या गाड्यांवरही बर्फाचे थर जमा झाले आहेत. हिमवर्षाव ही पर्यटकांसाठी एक आनंदाची पर्वणी असली तरी काश्मीर खोऱ्यातील सर्वसामान्य जनजीवन मात्र अस्ताव्यस्त्य होतं. हिमवर्षावामुळे रस्त्यावरील वीजेच्या ताराही बर्फाच्छादित होतात. जणू निसर्गाने विणलेली बर्फाची जाळीच...
राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे सेवा तसंच विमान वाहतूकही या मोठ्या हिमवृष्टीने प्रभावित झाली आहे. जम्मू ते श्रीनगर या राज्यातील सर्वात महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरही जागोजागी बर्फ साचल्याने जीवनावश्यक वाहतूक करणारे ट्र्क रस्त्यावर थांबले आहेत. सोमवारी म्हणजे आज सकाळपासूनच सुरु झालेल्या हिमवर्षावामुळे 200 मीटरच्या पुढील अंतरावरील काही दृष्टीक्षेपात येत नाही, यामुळेच विमान आणि रेल्वे वाहतूक प्रभावित झालीय. जम्मू-काश्मीर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या परीक्षांची नवीन तारखेनंतर जाहीर केली जाणार आहे.
प्रशासनाने बर्फ हटवलेल्या रस्त्यांवरुन अतिशय संथगतीने वाहतूक सुरू आहे. मात्र महामार्गावरील वाहतूक अजून बंदच आहे. जम्मू-काश्मीरमधील काही हायवेवर जागोजागी वाहने अडकून पडल्याची माहिती आहे. काश्मीर खोऱ्यातील या हिमवर्षावामुळे तापमान उणे दोन (-2) अशापर्यंत घसरलं आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात अती हिमवृष्टी झालेली आहे. आकड्याच्या भाषेत सांगायचं तर हा हिमवर्षाव चार ते पाच इंच असल्याचं सांगितलं गेलंय, म्हणजेच रस्त्यावर तसंच घरांवरील छपरावर चार ते पाच इंच किंवा त्यापेक्षाही जास्त बर्फाचा थर जमा झालेला आहे.
रुग्णवाहिका तसंच अन्य जीवनावश्यक सेवांच्या वाहतुकीत कमीत कमी अडथळे यावेत यासाठी स्थानिक प्रशासन आवश्यक ती सर्व काळजी घेत असल्याचं सांगण्यात आलंय. जागोजागी साचलेलं बर्फ हटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
शहरांतर्गत रस्त्यांवर साचलेलं बर्फ हटवण्याला प्राधान्य दिलं जात आहे. तरीही काश्मीर खोऱ्याला उर्वरीत देशाशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे ट्रॅक आणि हवाई धावपट्ट्यांवर बर्फ साचल्याने आणि सततच्या हिमवर्षावामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे काश्मीर खोऱ्याचा उर्वरीत देशाशी संपर्क तुटलेला आहे.
काश्मीर खोऱ्यात सरासरी चार ते पाच इंच हिमवर्षाव झाला असला तरी वेगवेगळ्या जिल्ह्यात मात्र हे वेगवेगळं आहे. श्रीनगरमध्ये (Srinagar) सात इंच, गुलमर्गमध्ये (Gulmarg) 12 इंच, पहलगाममध्ये (Pahalgam) नऊ इंच तर गुरेजमध्ये (Gurez) 18 इंच हिमवर्षावाची नोंद झालीय. कुपवाडा परिसरातील (Kupwara) काही ठिकाणी दोन फुटांपर्यंत बर्फ साचल्याच्या बातम्या येत आहेत.
काश्मीरमधील या बर्फवर्षावामुळे रस्त्याच्या कडेला असलेली झाडेही बर्फाच्छादीत झाली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना आणि पर्यटकांना बर्फात थिजलेल्या काश्मीरचा अनुभव मिळत असला तरी रस्त्याचा वापर खूप काळजीपूर्वक करावा लागत आहे.
काश्मीर खोऱ्यात पुढील 12 तास अशीच मोठी हिमवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
काश्मीर खोऱ्यात चिलाई कलान (Chillai-Kalan - Forty Days of Intense Cold) हा तब्बल 40 दिवसांचा सर्वात खडतर हवामानाचा काळ समजला जातो. या 40 दिवसात फक्त हिमवर्षावच नाही तर अतिशय बोचरे वारेही सुटतात आणि काश्मीरमधील सर्वसामान्य जनजीवन प्रभावित होतं. आज सोमवारी या चिलाई कलानचा शेवटचा दिवस आहे. यानंतर काश्मीरमधील हवामान सुसह्य होत जातं असं मानतात. 21 डिसेंबर 29 जानेवारी दरम्याचे 40 दिवस काश्मीरमधील सर्वाधिक कठीण हवामानाचे असतात, त्यानंतर चिलाई खुर्द (Chillai Khurd) हा वीस दिवसांचा काळ सुरू होतो.