नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाचं संकट खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक स्थिती चिंताजनक आहे. राज्यात उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं  केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.


केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात सर्वाधिक स्थिती चिंताजनक आहे. 36 पैकी 34 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


राज्यात काल दिवसभरात कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. काल राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंपैकी 26 जण मुंबईचे तर पुण्यातील 6 आणि औरंगाबाद, कोल्हापुरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 617 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल 354 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात कालपर्यंत 1 लाख 82 हजार 884 नमुन्यांपैकी 1 लाख 67 हजार 205 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 15,525 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 99 हजार 182 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 12 हजार 456 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 2819 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान कोरोनाबाधित आणि कोरोना मृतकांचा आकडा आज अजून वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे.  महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे. राज्यातील रुग्णांपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई मनपाच्या हद्दीत आहे.